पत्रकारिता आव्हानात्मक क्षेत्र; परस्परांना बळ देणे गरजेचे

आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे प्रतिपादन : श्रमिक पत्रकार संघातर्फे शालेय साहित्याचे वाटप

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क :

सोलापूर :  पत्रकारिता हे आव्हानात्मक क्षेत्र असून, पत्रकारांनी एकत्र येऊन परस्परांना बळ देणे गरजेचे आहे. शालेय साहित्य वाटप हा केवळ उपक्रम नसून, पत्रकार कुटुंबांना एकत्र आणणारा आणि संघटनेविषयी आत्मीयता निर्माण करणारा उपक्रम आहे, असे गौरोद्गार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काढले. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने महापौर विनायक कोंड्याल, डॉ. शैलेशकुमार पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेशकुमार पाटील, शहाजीराजे पवार युवा मंच आणि राजदीप (एचपी) गॅस एजन्सी यांच्या सहकार्याने आयोजित पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप समारंभात आमदार कल्याणशेट्टी बोलत होते.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाने केवळ पत्रकारांचे प्रश्न मांडण्यापुरते काम मर्यादित ठेवले नाही. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, पत्रकारांसाठी मेडिक्लेम योजना आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून संघटनेने आदर्श निर्माण केला आहे, असेही आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले.

याप्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार, डॉ. शैलेशकुमार पाटील फाऊंडेशनचे व्हाईस प्रेसिडेंट जगदीश पाटील यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत, दैनिक दिव्य मराठीचे संपादक महेश रामदासी, दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, दैनिक तरुण भारत संवादचे निवासी संपादक विजयकुमार देशपांडे, दैनिक जनसत्यचे संपादक सरदार अत्तार, दैनिक सकाळचे वृत्त संपादक वैभव गाढवे, न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष आफताब शेख उपस्थित होते. प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. आभार प्रदर्शन खजिनदार किरण बनसोडे यांनी केले.

याप्रसंगी शहाजी पवार म्हणाले, समाजातील प्रत्येक घडामोडी नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार प्रामाणिकपणे करतात. समाजातील सर्वसामान्य माणसाला आजही पत्रकारांवर विश्वास आहे. पत्रकारांनी एखादा प्रश्न उचलून धरला, तर न्याय मिळेल, अशी भावना समाजामध्ये आहे. त्यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी अधिक महत्त्वाची असून पत्रकार होणे हे पुढारी होण्यापेक्षाही कठीण काम आहे.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *