मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी केली सोलापूर विभागाची व्यापक पाहणी

 पायाभूत सुविधा, विकास, संरक्षा आणि प्रवासी सुविधांचा घेतला आढावा

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||

सोलापूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी नुकतीच सोलापूर विभागाची दोन दिवसीय सर्वंकष पाहणी केली. सुमारे ३८५ किलोमीटरच्या लातूर रोड–कुर्डुवाडी–मिरज या मार्गावरील पाहणीदरम्यान त्यांनी विविध सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. याशिवाय, कार्यरत रेल्वे सुविधांची तपासणी, रेल्वे अधिकारी, कर्मचारी, नागरिकांशी संवाद साधला. प्रवासी सेवांच्या तयारीचे, विशेषतः आगामी आषाढी वारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाचे परीक्षण केले.

लातूर येथे महाव्यवस्थापकांनी क्रू लॉबी, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (ईआय) इमारत येथे सुरू असलेले वॉशिंग-कम-पिट लाईन, स्टेबलिंग लाईनचे बांधकाम, मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी, अमृत भारत स्थानक योजना अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.   घरणी येथे प्रस्तावित नव्या रेल्वे स्थानकाच्या उभारणीच्या प्रस्तावाचाही सविस्तर आढावा घेतला.

यावेळी त्यांनी मांजरा, सीना व भीमा नदीवरील रेल्वे पूल, बोगदा क्रमांक २, समपातळी रेल्वे फाटक, ३३ केव्ही वीजवाहिन्यांचे क्रॉसिंग, ब्रिज मास्ट व्यवस्था तसेच विभागातील विविध सुरक्षा व क्षमता वृद्धीच्या कामांची पाहणी केली.

 

येडशी स्थानकाच्या पाहणीदरम्यान स्थानकाची स्वच्छता, हाऊसकीपिंग, प्रवासी सुविधा व देखभाल याबाबत समाधान व्यक्त करत विविध विभागांच्या समन्वित प्रयत्नांचे कौतुक केले.

 

कुर्डुवाडी येथे रेल्वे कार्यशाळा, रनिंग रूम, अल्ट्रासॉनिक फ्लॉ डिटेक्शन कार्यालय, ‘कवच’ प्रणाली कक्ष तसेच गँग हटची पाहणी करून त्यांनी आघाडीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि विभागात राबविण्यात येत असलेल्या आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा आढावा घेतला.

 

पंढरपूर येथे आषाढी वारी २०२६ च्या तयारीचा आढावा घेताना भाविकांसाठी प्रवासी सुविधा, पुरेसा पाणीपुरवठा, प्रभावी गर्दी व्यवस्थापन आणि रेल्वेच्या कार्यक्षमतेची तयारी यावर विशेष भर देण्यात आला. संत कुर्मदास मंदिराकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी रेल्वे रुळांवरील पारंपरिक मार्गाची पाहणी करताना त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेतल्या. कुर्डुवाडी, पंढरपूर येथे लोकप्रतिनिधी, प्रवाशांकडून स्थानक विकास, रेल्वे गाड्यांचे थांबे,पंढरपूर,मोडनिंब स्थानकांशी संबंधित विविध मागण्यांची निवेदने स्वीकारली.

कुर्डुवाडी यार्ड, ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE), समपातळी फाटक क्रमांक २४, (सलगरे) ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन (TRD) डेपो व ट्रॅक्शन सब-स्टेशन (TSS) यांच्या पाहणीदरम्यान विभागात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण सुरक्षा उपक्रमांचे परीक्षण करण्यात आले. यामध्ये टॉवर वॅगनमध्ये अँटी-थेफ्ट अलार्म प्रणाली व लाईव्ह फीडसह सीसीटीव्ही, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी टॉवर वॅगनच्या लिफ्टिंग प्लॅटफॉर्मवर इन्सुलेटिंग रबर मॅटची व्यवस्था, थर्मोव्हिजन कॅमेऱ्याद्वारे हॉटस्पॉट शोधणे, विभागातच विकसित करण्यात आलेले सेक्शन इन्सुलेटर अलाइनमेंट जिग, तसेच बिघाड होण्यापूर्वी तडे गेलेल्या फिटिंग्जची ओळख पटविण्याची प्रणाली यांचा समावेश होता. नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी सलगरे TRD डेपोमध्ये विकसित करण्यात आलेल्या मॉडेल OHE सेटअपचीही त्यांनी पाहणी केली. तसेच सालगरे TSS येथे सर्किट ब्रेकर चाचणी आणि SCADA आधारित वाऱ्याच्या वेगाचे निरीक्षण प्रणालीचे प्रात्यक्षिक पाहिले.

पाहणीदरम्यान विभागाच्या भविष्यातील क्षमतेत वाढ करणाऱ्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रस्तावांवरही चर्चा करण्यात आली. लातूर रोड–कुर्डुवाडी–मिरज मार्गाचे दुहेरीकरण करून मार्ग क्षमता वाढविणे, रेल्वे गाड्यांचा विलंब कमी करणे आणि प्रवासी तसेच मालगाड्यांची वाहतूक अधिक सुरळीत करणे यावर भर देण्यात आला. तसेच घरणी, मुरूड, बाभुळगाव, बामणी आणि जावळे येथे नवीन ब्लॉक स्थानके उभारण्याच्या प्रस्तावाचाही आढावा घेण्यात आला. या प्रस्तावामुळे विभागीय क्षमता, कार्यसुलभता आणि गाड्यांची वक्तशीरता सुधारण्यास मदत होणार आहे. याशिवाय, चिंक हिल–वडशिंगे आणि लऊळ–ढवळस दरम्यान कुर्डुवाडी जंक्शनला वळसा घालणाऱ्या कॉर्ड लाईनच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. या प्रस्तावामुळे इंजिन रिव्हर्सलची आवश्यकता कमी होऊन गाड्यांचा विलंब टळेल, कुर्डुवाडी जंक्शनवरील गर्दी कमी होईल आणि एकूणच रेल्वे संचालन अधिक कार्यक्षम होईल.

संपूर्ण पाहणीदरम्यान महाव्यवस्थापकांनी रेल्वे सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यावर भर दिला. रेल्वेमार्ग, पूल, बोगदे, निचरा व्यवस्था, यार्ड रचना, सिग्नलिंग प्रणाली आणि इतर अभियांत्रिकी मालमत्तांची सखोल तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने सुधारात्मक उपाययोजना करण्याच्या तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या.

या पाहणीदरम्यान मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्यासमवेत सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, विविध शाखांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

ही पाहणी मध्य रेल्वेची आधुनिकीकरण, पायाभूत सुविधा विकास, सुरक्षा वृद्धी आणि प्रवासी-केंद्रित सेवा यांप्रती असलेली कटिबद्धता अधोरेखित करणारी ठरली. सोलापूर विभाग या सर्व विकासकामांची वेळेत अंमलबजावणी करून अधिक सुरक्षित, जलद आणि कार्यक्षम रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच प्रदेशाच्या वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *