‘शाहिरी महोत्सवा’तून महाराष्ट्राच्या लोकशाहीर परंपरेचा जागर

सोलापुरात सोमवार दि. २७ ते २९ जुलै २०२६ दरम्यान आयोजन

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क :

सोलापूर : सोलापुरात  ‘शाहिरी महोत्सवा’तून महाराष्ट्राच्या लोकशाहीर परंपरेचा जागर होणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध शाहिरी परंपरेचा गौरव करणाऱ्या ‘शाहिरी महोत्सवा’चे आयोजन सोमवार, दि. २७ जुलै ते बुधवार, दि. २९ जुलै २०२६ या कालावधीत हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ७.०० वाजता हा कार्यक्रम होईल. अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी दिलीआहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने आयोजित  होणाऱ्या या महोत्सवातून महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी, सामाजिक प्रबोधनाशी आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेशी नाते सांगणाऱ्या शाहिरी कलेचा जागर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राची शाहिरी परंपरा ही केवळ मनोरंजनाची लोककला नसून, इतिहास, शौर्य, पराक्रम, सामाजिक प्रबोधन, राष्ट्रभक्ती आणि लोकभावना व्यक्त करणारे प्रभावी सांस्कृतिक माध्यम आहे. पोवाडे, लावण्या आणि विविध शाहिरी काव्यप्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास, वीरपुरुषांचे कार्य, सामाजिक जीवन आणि जनजागृतीचे विचार पिढ्यान्‌पिढ्या जनमानसात पोहोचविले गेले आहेत. ओजस्वी शब्दरचना, प्रभावी कथन, लयबद्धता आणि उत्स्फूर्त सादरीकरण ही शाहिरी कलेची वैशिष्ट्ये आहेत.

या तीन दिवसीय महोत्सवात राज्यातील मान्यवर शाहीर व शाहिरा आपल्या सहकाऱ्यांसह शाहिरी कलेचे सादरीकरण करणार आहेत. सोमवार, दि. २७ जुलै रोजी शाहीर सूरज किरणसिंग राऊळ व सहकारी, शाहिरा मंगल दळवीसह सहकारी शाहीर कल्याण काळे व सहकारी यांचे सादरीकरण होणार आहे. मंगळवार, दि. २८ जुलै रोजी शाहीर गणेश गलांडे व सहकारी, शाहिरा प्रा. संगीता हेमंतराजे मावळे व सहकारी तसेच शाहीर राजेंद्र कांबळे व सहकारी आपली कला सादर करणार आहेत. बुधवार, दि. २९ जुलै रोजी शाहीर संतोष साळुंखे व सहकारी, शाहीर बजरंग आंबी व सहकारी तसेच शाहीर सुभाष गोरे व सहकारी यांच्या सादरीकरणातून महोत्सवाची सांगता होणार आहे.

  • शाहिरी कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि लोकपरंपरा प्रभावीपणे जनमानसापर्यंत पोहोचतात. पारंपरिक शाहिरी कलेचे जतन व संवर्धन करताना तिच्या आशयाला समकालीन संदर्भांशी जोडणे आणि नव्या पिढीपर्यंत हा समृद्ध वारसा पोहोचविणे, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे.
  • हा उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे, अभिजात कला, लोककला आणि थोर कलावंतांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *