World Homoeopathy Day : 10 एप्रिल रोजी डॉ. सॅम्युएल हॅमिपन यांची जयंती. हा दिवस जागतिक होमिओपॅथिक दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जनजागृती व्हावी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी लिहलेला लेख…
इकडे कोविड-१९ मुळे जागतिक हाहाकार माजला असताना मात्र आपला जीव वाचवण्याची आणि संसर्गापासून बचाव करण्यासाठी नागरिकांची कसरत सुरु होती. नानाविध उपायांचा अवलंब ते करीत होते. उपाय तर्कशुध्द आहेत का ? शास्त्रीय पातळीवर त्यांना मान्यता आहे का ? एवढेच नव्हे तर विशिष्ठ स्थितीतील व्यक्तिसाठी ती उपयुक्त आहे का ? यापैकी कोणत्याही बाबींवर फारसा विचार न करता केवळ ऐकीव माहितीवर ते स्वतःच स्वतःवर प्रयोग करीत होते. उपचार करीत होते. यथावकाश देशपातळीवर, राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर सुध्दा प्रशासनाने भगिरथ प्रयत्न करून महामारीच्या मुसक्या बांधल्या आणि त्याला हद्दपार केलं.
“कोविड-१९” ने संक्रमित झालेला रुग्ण साधारणपणे अत्यवस्थ स्थितीतच डॉक्टरांकडे पाहोचायचा. कारण त्याच्या मनात असलेली प्रचंड भिती ! हतबल आणि निराश झालेला रुग्ण “आपुले मरण पाहिले म्यां डोळा !” याची खूणगाठ बांधून आणि सर्वाचा “निरोप ” घेऊनच रुग्णवाहिकेमध्ये चढायचा, नव्हे तर चढवला जायचा. नखशिखान्त पांढराशुभ्र वेश (पी. पी. ई. कीट) चढवलेले नर्स, डॉक्टर्स देवदूत असूनसुध्दा रुग्णांना मात्र जणू यमदूतच भासू लागले. ना धीराचे शब्द, ना आपूलकीची भाषा, ना स्पर्शातील आश्वासकता ! रुग्ण परेशान हैराण ! अशा सर्व विपरीत परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमधील वास्तव्याचा १० ते १५ दिवसाचा कालावधी संपवून रुग्ण जेव्हा घरी परत यायचा, तेव्हा तो अतिशय भेदरलेला, गोंधळलेला आणि अगतिक झालेला पहायला मिळायचा !
मित्रांनो एवढा सगळा इतिहास मी तुम्हाला सांगतोय, त्याचे कारण विलिनिकरण कक्षामध्ये किंवा वॉर्डामध्ये रुग्ण अगदी एकाकी पडत होता. ना नातेवाईक, ना मित्र परिवार ना सगेसोयरे त्याच्याशी ना वार्तालाप करु शकत होते, ना त्यांच्याकडून धीर मिळत होता. जणू काही मरण येत नाही म्हणूनच ते जगत होते. अशी काहीशी भावना रुग्णांची होती. त्यात भर म्हणून की काय मरणाची टांगती तलवार सतत डोक्यावर केव्हा पडेल ते नेम नाही. अशा विमनस्क परिस्थितीमध्ये रुग्ण मानसिक तसेच शारिरीक आजाराला बळी पडल्याचे आमच्या क्लिनिकमध्ये आम्हांस पहायला मिळे. यामध्ये सर्वामध्ये सर्वसामान्य आढळणारा विकार म्हणजे चिंता. ‘ चिंतेमुळे रुग्णामध्ये अस्वस्थतेची भावना निर्माण होते. आपण असुरक्षित आहोत. आपण अशक्त झालोत. अशी भावना निर्माण होते. त्यामुळे रुग्ण घाबराघुबरा होऊन घामेघूम होतो. ह्दयाचे ठोके वाढतात, हातापायांना मुंग्या येतात, घशाला कोरड पडते. आणि रुग्ण अधिकच बैचैन होतो. अशा वेळेस समुपदेशन आणि योग्य ती होमिओपॅथि औषधे रुग्णास परिणामकारक ठरु शकतात हे आमचे नेहमीचे निरीक्षण आहे. भावनात्मक आणि धिरोदात्त संभाषण रुग्णाला दिलासा देऊ शकते, आश्वासित करु शकते, त्यांच्यामध्ये नवीन उमेद जागवू शकते.
या नंतरचा त्रासदायक दुसरा आजार म्हणजे विचित्र भितीदायक स्वप्ने पडणे ज्यामध्ये रुग्ण स्वत: मरण पावला आहे, अशी स्वप्ने पडतात. किंवा आप्तस्वकिय यांचे मृत्यूचे स्वप्ने पडतात, अशी रुग्णांची तकार असते. अशा स्वप्नांमुळे रुग्ण नर्वस होतो, उदास होतो. काळजी वाढत असल्याने भूक लागत नाही. परिणामी अशक्तपणा, चिडचिड असे विकार आणि लक्षणांसह रुग्ण आमचेकडे येतो. हिस्ट्रि पाहिल्यास रुग्ण कोविड बाधित होता हे उघड होते. विशिष्ठ शारिरीक व्यायाम, योग्य ते समुपदेशन आणि समतोल आहार होमिओपॅथिक औषधांनी रुग्ण पूर्णपणे बरा होतो. हा आमचा अनुभव आहे.
या पाठोपाठ क्रमवारीमध्ये सांधेदुखीची तक्रार करणाऱ्या रूग्णांचा नंबर वराच वर आहे. कोविड पूर्वी संधीवाताच्या कोणत्याही लक्षणांनी क्षत नसलेला रुग्ण कोविड संक्रमित झाल्यानंतर अचानक हा त्रास सुरु झाल्याचे सांगत असतो. सर्वसामान्यपणे संधीवाताच्या रुग्णांना इतरही लक्षणे दिसत असतात. जसे ताप, सांध्यांना सूज येणे, स्नायूमध्ये कमकूवत पणा येणे वगैरे. परंतु अचानक कोविड १९ नंतर रुग्णांना रोग पूर्णपणे नाहिसा झाल्यानंतर सांधेदुखीचा त्रास सुरु झाल्याची तक्रार अनेक रुग्ण आमच्याकडे नोंदवितात. यामध्ये एक किंवा अनेक सांधे एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या वेळी दुखायची पीडा उत्पन्न करायची. यामध्ये गुडघ्याचा सांधा दुखण्याची तक्रार सुमारे ६० टक्क्यांच्यावर रुग्ण करत होते. त्याखालोखाल अनुक्रमे खांदयांचा घोटयाचा आणि कोप-याच्या सांध्याचा समावेश होता. नेहमीची वेदनाशामक औषधे यामध्ये फारशी उपयोगी पडलेली दिसली नाहीत. त्यासाठी रुग्णांचे सखोल सुक्ष्म निरिक्षण लक्षणांचा अचूक अभ्यास आणि रुग्णांची मानसिक स्थिती यांवर होमिओपॅथिक औषधे सांधेदुखीची पीडा कायमस्वरुपी हद्दपार करू शकते. हे निरीक्षणानंतरचे सत्य आहे.
पचनसंस्थेच्या / पचनसंस्थेसंबंधी विकारांची आणि लक्षणांची तकार नोंदविणा-या रुग्णांची संख्या सुध्दा लक्षणीय होती. वास्तविक पाहता कोविड- १९ आणि पचनसंस्थेचा दुरान्वयेसुध्दा काहीही संबंध नाही, असे असून सुध्दा कोविड-१९ मधून सुखरुप बाहेर पडलेले रुग्ण श्वसनसंस्था सोडून पचनसंस्थेच्या तक्रारी घेऊन क्लिनिकमध्ये येऊ लागले. अॅसिडिटी, अन्ननलिका आणि जठर यांचा दाह अपचन, बध्दकोष्ठता तर कधी अतिसार, करपट ढेकरा येणे, भूक न लागणे अशा तक्रारीसह रुग्णांची हजेरी क्लिनिक मध्ये होऊ लागली. वरील तकारीसाठी आम्ही नेहमी वारपणारी औषधे रुग्णांना देऊन पाहिली. परंतु त्या औषधांना रुग्ण प्रतिसाद देत नाहीत, असे दिसून आले. मग त्यांच्यासाठी विशिष्ठ प्रकारे लक्षणांचा विचार करुन औषध उपाययोजना करावे लागले. यामध्ये कोविड-१९ च्या दरम्यान रुग्णावर जास्त प्रमाणात प्रतिजैवके (अँटिबायोटिक्स) यांचा वापर केला गेला असल्यामुळे रुग्णांच्या अन्ननलिकेच्या आतील स्तर खराब झाला. त्यामुळे नियमित होत असलेली पचनसंस्थेची क्रीया बाधित झाली आणि त्यामुळे आपण जेवणात घेत असलेल्या विविध पाचकरसांचा, प्रथिनांचा आणि संप्रेरकांचा विनियोग अन्नपचनासाठी न झाल्यामुळे पनचसंस्थेच्या विविध तक्रारी उद्भभवीत झाल्या. यासाठी प्राणायाम, योगा आणि सकाळी लवकर उठून चालण्याचा व्यायाम रुग्णाला समजावूर सांगितल्यामुळे ९० टक्के आजार यांमध्ये कंट्रोल झाले. उर्वरित त्रासासाठी होमिओपॅथिक औषधे उपयुक्त ठरली. विपुल प्रमाणात वापरलेल्या प्रतिजैविकांच्या दुष्परिणांमूळे उद्भवलेल्या या समस्यावर होमिओपॅथी सर्वोत्कृष्ठ आहे, हे परत सिध्द झाले
त्वचा आणि त्वचेचे विकार यासाठी रुग्ण नेहमीच संवेदनशील असतो. कोविड-१९ सारख्या मरणासन्न स्थितीमधून बाहेर पडलेला रुग्ण त्वचाविकारांनी हैराण होतो. चेह-यावर काळे पुरळ येणे, त्वचा काळी पडणे, त्वचेला तीव्र कडं सुटणे, लाल चट्टे पडणे इत्यादी त्रासांनी रुग्ण क्लिनिकमध्ये येतो. यामध्ये सुध्दा होमिओपॅथि चांगल्याप्रकारे काम करते. असे दिसून आले. कोविड-१९ व्यतिरिक्त त्वचेच्या विकारावर होमिओपॅथि काम करते हे तर सर्वश्रुत आहे. परंतु कोविड नंतर उदभवलेल्या या विपरीत दुष्परिणाम बरे करण्यासाठी अर्सेनिक अल्वम, सल्फर सारखी औषधे सर्वोत्कृष्ठ ठरली आहे. त्याने रुग्णाला त्वरित आराम मिळवून दिला आहे. मेंदू मज्जातंतू आणि मांसपेशी यांनी बाधित झालेल्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर असलेली आम्हाला आमच्या संशोधक अभ्यासात प्राप्त झाली. जेष्ठ नागरिकांमध्ये आणि ४५ ते 55 या वयोगटातील नागरिकांची संख्या जास्त होती. हा संशोधक प्रकल्प विशेषतः कोविड ग्रस्त रुग्णांवर केंद्रीत केले असल्याने सर्वसामान्य रुग्णांच्या संख्येपेक्षा ही संख्या जास्त असल्याचे निर्देशनास आले. यामध्ये हातापायाला मुंग्या येणे, बोटांच्या पेरांची आग होणे, पाय मांडया, पोटरी आणि दंड प्रचंड प्रमाणात दुखणे विशेष म्हणजे मालीश केल्यावर किंवा चेपल्यानंतर ब-यापैकी आराम मिळणे ही लक्षणे आमच्यासाठी सूचक होती.
छोटया छोटया गोष्टीचे विस्मरण, चुकीच्या नावाने व्यक्तींना ओळखणे, घटना लक्षात न राहणे, मानसिक गोंधळ होणे ही लक्षणे कोविड – १९ च्या आजारानंतर रुग्णांना प्रकर्षाने जाणवू लागली. त्याचबरोबर भोवळ येणे, डोकेदुखी, अर्धशिश तोल जाणे, चालताना किंवा बसल्यानंतर हालल्या सारखे वाटणे, समोरच्या वस्तू दोन-दोन दिसणे यासारख्या त्रासदायक आजारांनी कधी कधी रुग्ण म्हणायचा डॉक्टर कोविड १९ परवडला पण हा आजार अगदी नकोसा झाला आहे बघा. वर वर्णन केलेल्या आजारावर आणि या सारख्या समसदृश विकारावर संशोधन करुन झिंकम मेटालिकम, लायकोपोडियम, जेलसेमियम यासारखी अतिशय उपयुक्त औषधी रोगासाठी वरदान ठरली.
कधी कधी आपले आपल्यालाच आश्चर्य वाटत की, एवढया मरणासन्न परिस्थितीतून आपण कसे काय बाहेर पडलो ? इतक्या त्रासातून सुखरूप बाहेर पडण्याचा मार्ग होमिओपॅथिक औषधांच्या माध्यमातून मानवतेला मिळाला आहे. शारिरीक अंत्यतिक पिडा, त्रास नाहीसा करण्याचं मौल्यावान कर्तुत्व होमियोपॅथिक बहुगुणी औषधांनी पार पाडले आहे. म्हणूनच अशा बहुगुणी आणि रुग्णास दिलासा देत असणा-या होमिओपॅथिक औषधोपचारांचा शोध लावणा-या डॉ. सॅम्युअल हनीमन यांच्या कर्तृत्वाला वंदन करणाचे भाग्य आपल्यास मिळत आहे. समस्त मानव वर्ग त्यांचे आयुष्यभर ऋणी राहील. आज या महामानवाच्या जयंती निमित्त त्रिवार वंदन.
– डॉ. श्रीकांत कुलकर्णी, मेडिकल डायरेक्टर, गांधी नाथा रंगजी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल, सोलापूर. (दूरध्वनी क्रमांक : 9422067490)