- बेकायदेशीर नियुक्तीसंदर्भात राज्यस्तरीय चौकशी समिती जि. प. आरोग्य विभागात
सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी सेवेतून कार्यमुक्त करण्यात आलेले नागेश चौधरी यांना पुन्हा बेकायदेशीररित्या सेवेत सामावून घेतले आहे. त्यामुळे चौधरी यांना सेवेतून कमी करणेबाबत वंचित बहुजन आघाडीचे महासचिव जावेद लाल पटेल यांनी तक्रारी दाखल केली होती. त्याअनुषंगाने सदरच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती जि. प. आरोग्य विभागात आज येणार असून “नागेश चौधरी हाजीर हो…” चा आदेश आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (मुंबई) चे सहसंचालक (अतां) सुभाष बोरकर यांनी यासंदर्भात 5 एप्रिल 2023 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव जावेद पटेल यांच्याकडील प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी अहवाल आपल्यामार्फत तसेच फेरचौकशी अहवाल उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे यांच्यामार्फत या कार्यालयास प्राप्त झाला होता. प्राप्त दोन्ही चौकशी अहवालामध्ये नागेश चौधरी यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे तसेच नागेश चौधरी यांना अभियानांतर्गत कार्यमुक्त केल्यानंतर त्यांना दिलेली नियुक्ती, पुर्ननियुक्ती आदेश व मानधन संरक्षणाची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर यांच्या मान्यतेने केले असल्याचे नमुद केले होते. उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे यांच्या प्राप्त अहवालामध्ये नागेश चौधरी यांच्यावर ज्या संचिकेच्या आधारावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली होती. ती संचिका जिल्हा कार्यालयात आढळून येत नसल्याचे किंवा गहाळ झाले असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे सदर संचिकेचा शोध घेण्याबाबत तसेच संचिका उपलब्ध होत नसल्यास गहाळ करण्याबाबत अधिकारी/कर्मचारी विरुध्द जबाबदारी निश्चित करुन कार्यवाही करण्याबाबत व केलेल्या कार्यवाहीचा अंतिम अहवाल या कार्यालयास सादर करण्याबाबत 13 जुलै 2022 7 सप्टेंबर 2022 रोजीच्या पत्रान्वये जिल्हा आरोग्य अधिकारी, सोलापूर यांना कळविण्यात आले होते.
त्यास अनुसरुन संदर्भ क्र. ४ अन्वये आपल्यामार्फत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झाला आहे. त्यानुसार ज्या कर्मचा-याकडे सदर नस्ती होती. त्यांचा मृत्यु माहे सप्टेंबर २०१८ मध्ये झाला असून सदर नस्ती आढळून येत नसल्याचे आपण या कार्यालयास कळविले आहे. सदर सर्व बाब गंभीर व संशयास्पद असल्याने संदर्भ क्र. ५ अन्वये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सदर प्रकरणाची तपासणी/चौकशी करण्याकरीता सहसंचालक (अतांत्रिक), राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांना नियुक्त करण्यात आले आहे.
त्यास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, सदर प्रकरणाची तपासणी/चौकशी करण्याकरीता सहसंचालक (अतांत्रिक), राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई हे सोलापूर जिल्हयात 19 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 रोजी उपस्थित राहणार आहेत. त्यांना सहकार्य करण्याकरीता राज्यस्तरावरील तक्रार निवारण अधिकारी हे सुध्दा येत आहेत. तरी सदर प्रकरणास अनुसरुन संबंधीत तक्रारकर्ता, ज्यांच्या विरुध्द तक्रार आहे असे नागेश चौधरी व इतर संबंधीत अधिकारी/कर्मचारी, मृत कर्मचारी प्रकाश कंबळे यांच्याकडील पदभार ज्या कर्मचा-यांकडे सोपवण्यात आले होते. असे सर्व संबंधीत कर्मचा-यांना चौकशी करीता उपस्थित राहण्याबाबत आपल्या स्तरावरुन आदेशीत करण्यात यावे, असे पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियान (मुंबई) चे सहसंचालक (अतां) सुभाष बोरकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठवले असून त्यानुसार आजपासुन सदरच्या प्रकरणाची चौकशी होणार आहे.
कंबळे यांच्या मृत्युची सीबीआय चौकशी करावी
– नागेश चौधरी हे सेवेत असताना फाईल गहाळ करणे, दस्तावेजामध्ये खाडाखोड करणे, नस्तीमध्ये विसंगती निर्माण करणे, शासकिय कामामध्ये बाधा आणणे, नस्तीमधील नोटींगकरीता दिशाभुल सल्ला देणे, वरीष्ठ अधिकारी यांच्याशी उच्च आवाजात व आरेरावीची भाषेमध्ये बोलणे, कार्यालयातील महत्वाच्या बावी व माहीतीचे फोटो, झेरॉक्स काढून त्रयस्त व्यक्तीस देणे आदी प्रकारच्या गंभीर स्वरुपाच्या चुका केल्याने चौधरी यांची उचलबांगडी केली होती. असे असताना पुन्हा नागेश चौधरी यांच्यावर ज्या संचिकेच्या आधारावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली होती. ती संचिका जिल्हा कार्यालयात आढळून येत नसल्याचे किंवा गहाळ झाले असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे यालाही चौधरी हेच जबाबदार असु शकतात. त्यामुळे त्यांना तत्काळ सेवेतून काढून टाकावे. आणि ज्या मृत प्रकाश कंबळे यांचा यामध्ये उल्लेख केला आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआय मार्फत करावी, त्यांचे कॉल डिटेल्स तपासावे, जेणेकरून त्यांच्या मृत्यूस जबाबदार तत्कालीन वरिष्ठ अधिकारी व त्यांचे कर्मचारी यामध्ये असल्याची चर्चा जि. प. आरोग्य विभागात रंगली आहे.