राज्यपाल यांचा मंगळवारी सोलापूर जिल्हा दौरा

सर्व शासकीय यंत्रणांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे

पार पाडावी : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे मंगळवार,दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील सर्व उद्योजक, व्यावसायिक, पत्रकार, प्रतिष्ठित व्यक्ती, आजी-माजी खासदार व आमदार, जिल्ह्यातील सर्व अधिकारी, राजकीय नेते, राजकीय पक्ष, जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी यांच्याशी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे ते संवाद साधणार आहेत. हा दौरा यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा व दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित माननीय राज्यपाल दौऱ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, पोलीस उपयुक्त दिपाली काळे, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, यांत्रिकी विभाग कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य मंगळवार, दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग, अन्न औषध विभाग, पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, महापालिका, जिल्हा परिषद, माहिती विभाग या सर्व विभागांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी. सर्व संबंधित नोडल अधिकारी व कॅम्प अधिकारी यांनी परस्परात समन्वय ठेवून दौरा यशस्वी करावा. नियोजनात कुठेही हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश त्यांनी दिले.

प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियुक्ती केलेले नोडल अधिकारी व कॅम्प अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचे वाचन केले व सदरची जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडावी असे त्यांनी सांगितले. राज्यपाल दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे येतील त्यानंतर सकाळी ११.१५ ते १२.५०  या कालावधीत जिल्ह्यातील अधिकारी, पालकमंत्री, खासदार, आमदार, राजकीय पक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, लॉयर्स असोसिएशन, चार्टर्ड अकाउंटंट, जिल्ह्यातील उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, मान्यवर व्यक्ती, एनजीओ, पत्रकार व अन्य यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी ते सोलापूर हुन पुढील कार्यक्रमासाठी जाणार आहेत. तरी या कालावधीत सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत दक्ष रहावे, असेही कुंभार यांनी सुचित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *