वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा १६ जिल्ह्यातून जाणार

 

खासदार डॉ. अजित गोपछडे : वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचे

बुधवारी सोलापुरात  उत्साहात स्वागत

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : वीरशैव समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेत त्यांचा सन्मान करण्यासाठी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी काढलेल्या वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचे बुधवार, दि. ११ सप्टेंबर २०२४ रोजी सोलापुरात आगमन झाले. या यात्रेचे सोलापुरात तमाम  वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. हिंदू वीरशैव लिंगायत मंचच्यावतीने वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा काढण्यात आली असल्याचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी सांगितले.

भक्ती स्थळ ते शक्तीस्थळ अशी ही वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा असून, भक्तीस्थळ हे       श्री क्षेत्र राजूर (अहमदपूर) येथील राष्ट्रसंत श्री शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचे संजीवन समाधी असलेले ठिकाण आहे. येथून या वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेला सुरुवात झाली असून, या यात्रेचा समारोप शक्तिस्थळ अर्थात  जगदज्योती  महात्मा बसवेश्वर महाराजांची तपोभूमी असलेले ठिकाण मंगळवेढा (जि. सोलापूर) होणार आहे. भाक्तीस्थळ ते शक्तिस्थळ असा महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यामध्ये स्पर्श करून समाजातीत्ल विविध क्षेत्रातील वीरशैव बांधवाचा सन्मान करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी सांगितले. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, औद्योगिक, आर्थिक,कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या समाजातील सर्व वीरशैव लिंगायत बांधवांचा सन्मान करणे, समाजातील विविध सहकारी, शैक्षणिक संस्था, बँकिंग, हॉस्पिटल्स यामध्ये काम करणारे डॉक्टर्स, व्यापारी यांचा सन्मान करीत जाणे हा या वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचे उदिष्ट असल्याचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी सांगितले.

खासदार डॉ. अजित गोपछडे  म्हणाले, आपल्या स्वतःच्या सन्मानासाठी ही यात्रा नसून, समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करीत आम्ही पुढे जात अहोत. धाराशिवमध्ये आमच्या या सन्मान यात्रेच्या माध्यमातून दुग्ध शर्करा योगच घडून आला. जरी ही सन्मान यात्रा ही वीरशैव लिंगायत समाजाची असली तरी आमच्या या सन्मान यात्रेचे धाराशिवमध्ये विविध समाजाच्यावतीने स्वागत करण्यात आले. येथे सकल मराठा, धनगर, माळी, वंजारी, बौद्ध समाजाच्यावतीने आमच्या या सन्मान यात्रेचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले. त्या सर्वांनी या यात्रेमध्ये समाविष्ट होऊन महात्मा बसवेश्वरांची जी शिकवण आहे, बाराव्या शतकामध्ये ज्या अनुभव मंडपाची स्थापना केली गेली आणि सगळ्या अठरा पगड जातींनी एकत्रित येऊन या जगाचा विकास करण्याचा मूलमंत्र दिला.  या दृष्टीकोनातून जो संस्कार दिला, त्या दृष्टीकोनातून संपूर्ण समाज बांधव आमच्या सन्मान यात्रेचे स्वागत केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित जो युवकवर्ग होता, त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला. कारण ज्या उपक्रमासाठी, कामासाठी,  हेतूसाठी आम्ही निघालोय, तो आमचा उपक्रम यशस्वी झाला आहे. या यात्रेचा समारोप मंगळवेढा येथे होणार आहे. यावेळी सबंध लिंगायत समाजातील अठरा पगड जाती एकत्रित येणार आहे. या यात्रेचा उद्देश सकल लिंगायत  समाजातील सर्व पोटजातींना एकत्रित करणे आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची निधी वाढवून मिळावी अशी आमची मागणी आहे. लिंगायत समाजातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी शिक्षणाची सोय, त्यांच्या निवासाची, वसतिगृहाची सोय करण्यात यावी. यांच्यासाठी मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर अशा ठिकाणी निवासी वसतिगृहाची सोय करण्यात यावी. विविध ज्या काही समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत, विद्यार्थ्यांचा ज्या काही समस्या आहेत, त्या-त्या त्या समस्यांचे निराकरण करावं, समाजासोबत संवाद करावा, प्रबोधन करावं, समाजातील आरोग्य विषयक योजना आहेत, सरकारच्या ज्या काही योजना आहेत, त्या जनतेपर्यंत पोहोचल्या आहेत की नाहीत, या संदर्भातील समन्वय करावा, यादृष्टीकोनातून ही एक प्रबोधनात्मक सन्मान यात्रा काढलेली आहे, असे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी शेवटी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *