सोलापूर विद्यापीठात जिल्हास्तरीय सरपंच परिषद
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : छोट्या-छोट्या गोष्टीतून गाव-खेडी सुधारण्याची संधी सरपंचांना आहे. स्वच्छ पाणी, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, वृक्षारोपण, निराधारांची सेवा या गोष्टीतून गावचा विकास साधता येतो. सरपंचांनी आई बनून गावची सेवा केल्यास गाव-खेडी समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन पाटोदाचे आदर्श सरपंच भास्कर पेरे-पाटील यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पीएमउषा विभाग यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय सरपंच परिषदेचे उद्घाटन भास्कर पेरे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे होते. याप्रसंगी छत्रपती संभाजीनगरचे माजी जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, एनएसएसचे जिल्हा समन्वयक डॉ. वीरभद्र दंडे उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी केले.
भास्कर पेरे-पाटील म्हणाले, सरपंचांनी ठरवल्यास आणि त्याप्रमाणे काम केल्यास गावांचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. आज मोठ्या प्रमाणात शासनाकडून निधी दिला जातो. ग्रामनिधीदेखील मिळतो. त्यासाठी व्यवस्थित आराखडा तयार करून गावातील लोकांना पायाभूत सेवा-सुविधा देण्यासाठी सरपंचांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. ग्रामपंचायतीचा उत्पन्नाचा सोर्स वाढण्यासाठी उद्योगाकडेदेखील वळले पाहिजे.
- कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर म्हणाले, गाव खेड्यांची उन्नती झाली तरच देशाची प्रगती होणार आहे. कारण ७० टक्के खेड्यांनी व्यापलेला देश आहे. आज गाव-खेडी सुधारण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. अनेक गावांची आज चांगली प्रगती होत आहे. गावचा विकास होण्यासाठी सरपंचांनी स्वच्छता, शिक्षण, स्वच्छ पाणी, आरोग्य यासारख्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष संवर्धनाची देखील आवश्यकता आहे. विकसित भारत घडताना सर्वांना जेवण मिळाले पाहिजे, याकडे देखील लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमात हरित लोक मित्र परिवाराचे महेंद्र घागरे यांच्याकडून विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला डिजिटल कॅमेरा भेट म्हणून देण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. युवराज सुरवसे, आभार प्रदर्शन डॉ. वीरभद्र दंडे यांनी मानले.