डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांची माहिती
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्योदवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन झाले असून, या केंद्रासाठी विद्यापीठाने ३० लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. भारतीय राज्यघटनेला ७५ वर्षे पुर्ण होत असल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सर्व महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्योदवी होळकर सोलापूर विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राची पहिली बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे हे होते. यावेळी अध्यासन केंद्राचे समन्वयक तथा सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. टी. एस. मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यासनासाठी स्वतंत्र इमारत निर्मिती तसेच निधी संकलनाबाबत ठराव करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावे यासाठी पुण्यश्लोक अहिल्योदवी होळकर सोलापूर विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, संविधान जनजागृती आणि संशोधन या घटकावर भर देण्याबाबत सदस्यांनी यावेळी सूचना केल्या.
यावेळी डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी अध्यासनाचे काम हे अभ्यासक्रम, उपक्रम, कार्यक्रम आणि संशोधन प्रकाशन या चार तत्वावर गतीमान व्हावे, अशी सुचना केली. यावेळी डॉ. गौतम कांबळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील २५ एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण संशोधन केंद्राच्या नियोजीत आराखड्याची मांडणी केली. या आराखड्यास सर्व सदस्यांनी मान्यता देवून विद्यापीठाच्या सिनेट आणि व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर केंद्रीय सामाजिक न्याय विभागाला सादर करण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी बोलताना राजाभाऊ सरवदे म्हणाले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रासाठी सर्व मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या बैठकीस सदस्य डॉ. एम. आर. कांबळे, डॉ. सारीपुत्र तुपेरे, डॉ. मारुती घंटेवाड, डॉ. चंद्रकांत चव्हाण, डॉ. सिद्राम सलवदे, डॉ. दिगंबर वाघमारे आदी उपस्थित होते. विद्यापीठाचे कक्ष अधिकारी नासीर देशमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. डॉ. एम. आर. कांबळे यांनी यावेळी अध्यासन केंद्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ देणार असल्याचे सांगितले.