विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे सोलापूर विद्यापीठाच्या प्रश्नाबाबत घेणार बैठक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या भेटीनंतर तातडीची कार्यवाही

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||

मुंबई  : महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. ८  एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता विधान भवन, मुंबई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात उच्चस्तरीय बैठक विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. दि. ३१ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी विद्यापीठास प्रत्यक्ष भेट देऊन विद्यापीठ विकासासंदर्भात विविध विषयांवर कुलगुरु प्रा.डॉ.प्रकाश महानवर यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी येत्या १५  दिवसात यासंदर्भात मुंबईत बैठक घेऊन प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत त्यांनी आश्वासीत केले होते, त्यानुसार ही बैठक  १५  दिवसांच्या आत आयोजित करण्यात आली आहे. कुलगुरु, संबंधीत खात्यांचे मंत्री, सचिव तसेच जिल्हाधिकारी, सोलापूर हे या बैठकीस उपस्थित राहणार असून, प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याने या बैठकीकडे सोलापूर जिल्हावासिय तसेच विद्यार्थी – पालकांचे लक्ष वेधले गेले आहे.

  दि. ३१ मार्च २०२५  रोजीच्या सोलापूर दौऱ्यात महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक, विस्तारीत प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. विद्यापीठाने संपादित केलेल्या जमिनीवर माळढोक पक्षी अभयारण्य, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आणि राखीव वनक्षेत्र असे विविध आरक्षण आहे. विद्यापीठ क्षेत्राच्या चारही बाजूस आरक्षण असल्याने येण्या-जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. या आणि अन्य प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मंगळवार, दि. ८ एप्रिल २०२५ रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वन मंत्री गणेश नाईक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कुलगुरु प्रकाश महानवर आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *