भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक

कुलगुरू प्रा. प्रकाश  महानवर : सोलापूर विद्यापीठात ‘भाषा व वाङ्ग्मयविषयी राष्ट्रीय कार्यशाळा

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : संवाद साधण्यासाठी, विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी भाषेचा वापर होतो. आज विज्ञान-तंत्रज्ञानासह इतर विषयांचे ज्ञान घेण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण देण्याची सोय होत आहे. मातृभाषेबरोबरच कोणत्याही एका भाषेवर आपले प्रभुत्व असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा आणि वाङ्ग्मय संकुलामार्फत ‘साहित्याची पुनर्कल्पना: समकालीन युगातील अंतःविषय दृष्टीकोन’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू प्रा. महानवर हे बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. इरेश स्वामी उपस्थित होते.  भाषा संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी विद्यापीठातील भाषा व वाङ्ग्मय संकुलाची माहिती देत भाषेचे आठ विभाग विद्यापीठात सुरू असल्याचे सांगितले.

  • कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा व वांग्मय संकुलाला स्वतंत्र इमारत पीएम उषा योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून बांधून मिळणार आहे.  येथे कायम शिक्षक मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार  आहे. संस्कृत ही सर्व भाषांची जननी असून, विविध भाषेचा सखोल ज्ञान घेण्यासाठी संस्कृतचा अभ्यास करावा, असे आवाहनही त्यांनी  केले.
  • डॉ. इरेश स्वामी म्हणाले, अभिव्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे भाषा. सरळ व साध्या भाषेत माणूस व्यक्त होत असतो. महात्मा बसवेश्वर, संत ज्ञानेश्वर तसेच विविध संत, शरण, कवी, साहित्यिकांनी भाषा समृद्ध केली आहे. प्रत्येक क्षेत्रात अभिव्यक्तीला महत्त्व आहे. सर्व भाषा या सारख्या आहेत. आपण ज्या भूमीत जन्मतो, तेथील भाषा ही आपली मातृभाषा होते. ती आपल्याला लवकर कळते व समजते. प्रत्येक भाषा ही समृद्ध व अभिजातच असते, असेही ते म्हणाले.

स्वागत प्रा. विद्या लेंडवे यांनी केले. परिचय प्रा. श्रेया शहा यांनी करून दिला.  सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली, आभारप्रदर्शन प्रा. सुमय्या बागवान यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *