- बीए अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर
सोलापूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बीए अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल 18 जुलै 2023 रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. तर बीकॉम, बीएससी, बीसीए आणि बीबीए अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे निकाल तयार असून 18 जुलै रोजी रात्री उशिरा संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून माहे मार्च-एप्रिल 2023 च्या उन्हाळी सत्राच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास रविवारपासून सुरुवात झाली आहे. प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत व प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ व परीक्षा विभागाची टीम परीक्षांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी रात्रंदिवस उत्तरपत्रिकांची तपासणी व निकाल लावण्यासाठी काम करीत आहे. यामुळे परीक्षा संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये वेळेवर निकाल जाहीर होत आहेत.
रविवारी बीएससी बायोटेक्नॉलॉजी आणि बीए च्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. तसेच बीकॉम, बीएससी, बीसीए आणि बीबीए अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे निकाल तयार असून मंगळवारी रात्री उशिरा संकेतस्थळावर निकाल अपलोड करण्याचे काम सुरू होते. परीक्षा झालेल्या सर्वच अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी यंत्रणा काम करीत असल्याचे कुलसचिव योगिनी घारे आणि परीक्षा संचालक डॉ. शिवकुमार गणपुर, ओएसडी डॉ. दीपक ननवरे यांनी सांगितले.