आमदार सचिन कल्याणशेट्टी : सोलापूर जिल्ह्यातील ३९ गावांमधील ४ हजार ८५९ स्वामित्व सनद वाटप
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : स्वामित्व सनद वाटप योजना” ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्याचा एक प्रयत्न असल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्वामित्व योजना, ग्रामीण विकासाबाबतचे महत्व सर्वांना पटवून सांगताना म्हंटले आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, याअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्याचा एक प्रयत्न आहे. त्यानुसार केद्र शासन, भूमी अभिलेख विभाग व ग्रामविकास यंत्रणामार्फत लोकांना स्वांतत्र्यपूर्व काळापासून अद्यापपर्यंत न झालेले त्यांच्या घरांचे अभिलेख तयार करुन त्यांचा मालकी हक्काचा पुरावा म्हणून प्रत्येक गावठाणामधील घरांचा नकाशा व सनद अत्याधूनिक ड्रोन सर्व्हे द्वारे तयार केले आहेत. या तयार झालेल्या अभिलेखामुळे गावामधील लोकांना देखील गृहकर्ज मिळण्यास मदत होणार आहे. त्या मिळणा-या कर्जामुळे लघू उद्योगधंदे यांना चालना मिळणार असल्याचे आ. कल्याणशेट्टी सांगितले.
केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेंतर्गत शनिवार, दि. १८ जानेवारी २०२५ रोजी संपूर्ण देशातील २४६ जिल्ह्यातील ५८ लाख लाभार्थी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पध्दतीने सनद वाटप कार्यक्रम झाला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील ३९ गावांमधील ४ हजार ८५९ स्वामित्व सनद वाटप जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार सचिन कल्याणशेट्टी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्वामित्व सनद वाटप कार्यक्रम नियोजन भवन येथील सभागृहात झाला. अध्यक्षस्थानी आमदार सचिन कल्याणशेट्टी होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, जिल्हा भूमिलेख अधीक्षक दादासाहेब घोडके, नगर भूमापन अधिकारी गजानन पोळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख घोडके यांनी स्वामित्व योजनेचे व सनदेचे महत्व विषद करीत त्यासंदर्भातील चित्रफित सादर केली. यावेळी जिल्ह्यातील ३९ गावांमधील ४८५९ नागरिकांना स्वामित्व हक्काची सनद मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली. प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आ. सचिन कल्याणशेट्टी व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सनद वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविक घोडके, आभार प्रदर्शन गजानन पोळ यांनी केले.