जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांचे आवाहन, अडीचशेहून अधिक क्रीडा शिक्षकांची उपस्थिती
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अपुरा स्टाफ पाहता आगामी शालेय क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याची जबाबदारी क्रीडा शिक्षक आणि क्रीडा संघटनेचे आहे. त्यामुळे सर्व क्रीडा शिक्षक आणि क्रीडा संघटनेने या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.
सोलापूर महानगरपालिका जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्यावतीने शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ साठी जिल्हा क्रीडा कार्यालय येथे क्रीडा शिक्षकांची बैठक पार पडली.त्यावेळी क्रीडा अधिकारी नरेंद्रपवार बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, क्रीडा अधिकारी नदीम शेख, प्रभारी क्रीडा अधिकारी मच्छिंद्र घोलप, शारीरिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव, सोलापूर शहर शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक महासंघाचे शहर अध्यक्ष प्रा.संतोष खेंडे उपस्थित होते.

-
याप्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार म्हणाले, आगामी शालेय क्रीडा स्पर्धा कोणत्याही शासकीय पदाधीकार्यांशिवाय स्पर्धा घ्यायचे आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात देखील क्रीडा अधिकारी स्टाफ अपुरा आहे.
-
सन २०२५-२६ सालच्या आगामी शालेय सर्व क्रीडा स्पर्धा क्रीडा शिक्षक आणि संघटनेच्या मदतीने आयोजित केली जातील. यासंदर्भात रीतसर शिक्षण खात्याकडून ऑर्डर काढण्यात येईल. ४९ खेळांच्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन करण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे.
सोलापूर शहरातील अनुदानित शाळांसाठी विविध प्रकारचे अनुदान देण्यात येते. जवळपास साडेतीन कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मैदानासाठी सात लाख रुपयांचे तर क्रीडा साहित्यासाठी तीन लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. व्यायाम शाळा बांधकामासाठीच्या अनुदानात आता वाढ करण्यात आली असून, ती आता सात लाख रुपयांवरून यंदाच्या वर्षीपासून १४ लाख रुपये इतके अनुदान शासन देणार आहे. क्रीडांगण विकास योजनेंतर्गत शाळेसाठी फ्लड लाईटची व्यवस्थादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोलापूर शहरातील अनुदानित शाळेतील क्रीडा शिक्षकांनी अनुदान मिळवण्यासाठी परिपूर्ण असा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत. सर्व योजनेचा लाभ घ्यावा. क्रीडा सुविधा योजनेसाठी देखील एक कोटी वीस लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे. त्यामुळे अनुदानित व विनाअनुदानित शाळांना या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ही करण्यात आले आहे. या शालेय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजन,अडीअडचणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या शालेय क्रीडा स्पर्धेच्या बैठकीसाठी शहरातील अडीचशेहून अधिक क्रीडा शिक्षकांची उपस्थिती होती.

कोण काय म्हणाले…
दशरथ गुरव : मुला- मुलींसाठी मैदानावर स्वच्छतागृह स्वच्छ असावे. महापालिकेची वैद्यकीय सेवा असणे गरजेचे आहे. मैदानावर पोलीस संरक्षण देण्यात यावे. पाण्याची व्यवस्था करावी. महानगरपालिकेचे मैदान टाकण्यासाठी कंत्राटी कामगार नेमावेत. तांत्रिक कमिटी, तक्रार निवारण समितीदेखील असावी.
प्रा. संतोष खेंडे : यावर्षी होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धा पार्क मैदानावर घेण्यात यावे. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी घेतलेल्या या बैठकीला जिल्हा क्रीडा कार्यालयातील दोघांची उपस्थिती आहे. अनेक समस्या आहेत. महानगरपालिका क्रीडा अधिकारी यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे महापालिका शालेय क्रीडा स्पर्धाच्या अयोज्नावेळी अनेक अडचणी येणार आहेत. या बैठकीला महानगरपालिका आयुक्त किंवा उपायुक्त उपस्थित राहणे गरजेचे होते. मात्र ते आलेले नाहीत. त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवला. मात्र ते देखील या स्पर्धा घेणार नाहीत, असे स्पष्टीकरण दिलेले आहे. या सर्व स्पर्धा पार्क स्टेडियमवर आणि आउटडोर गेम व्हायला पाहिजेत. गिरणी कामगारांच्या खेळाडूसाठी कायमस्वरूपी मैदान आहे. त्यातले अडीच महिने शालेय, शहर व ग्रामीण भागातील खेळाडूंच्या स्पर्धेसाठी रिझर्व असायला पाहिजे.
सुहास छंचुरे : शालेय क्रीडा स्पर्धा लवकरात लवकर सुरू कराव्यात. स्पर्धेच्या दरम्यान मैदानावरती महानगरपालिकेची तांत्रिक समिती सदस्य असणे गरजेचे आहे. स्पर्धेदरम्यान कोणत्याही उद्घाटनाचा कार्यक्रम घेऊ नये. जेणेकरून खेळाडूंना उशिरा होऊ नये. स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना स्पर्धा संपल्यानंतर रोख रक्कम स्वरूपात किंवा ट्रॉफी देऊन खेळाडूंना सन्मानित करण्यात यावे. दि. १६ ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात करण्यात यावी. स्पर्धेच्या दरम्यान प्रथमोपचार पेटीची व्यवस्था करावी.
डॉ. उज्वल मलजी : शालेय स्पर्धासाठी प्रशिक्षकांची नेमणूक करावी. राज्य आणि विभागीय क्रीडा स्पर्धा सोलापूरमध्ये घेण्यात यावे.
