पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबाल स्पर्धेसाठी ग्लोबलच्या तिघांची निवड
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आयोजित पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबाल स्पर्धेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विद्यापीठ संघात ग्लोबल व्हिलेज कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बोरामणी येथील सोवित लक्ष्मण राठोड, सागर गोपाल आचलकर व शिवम शंकर राठोड या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ग्लोबल व्हिलेजच्या सोवित राठोडची सलग दुसऱ्यावर्षी सोलापूर विद्यापीठाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबाल स्पर्धा दि. १४ ते १८ डिसेंबर दरम्यान नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे पार पडणार आहेत.
विद्यापीठाच्यावतीने आंतर महाविद्यालयीन स्पर्धेतील चमकदार कामगिरी व बार्शी येथे सराव शिबिरामध्ये घेतलेल्या परिश्रमाने या तीनही विद्यार्थ्यांनी निवड झाली असल्याचे महाविद्यालयाचे प्रा. प्रदीप राठोड यांनी सांगितले. मागील वर्षी महाविद्यालयाच्या पहिल्याच प्रयत्नात सोवित लक्ष्मण राठोड याची केवळ विद्यापीठाच्या संघात निवड न होता त्याची विद्यापीठाच्या कर्णधारपदी निवड झाली होती. यावर्षी सुद्धा पुनस्श्च एकदा कर्णधाराची धुरा सोवितकडे दिल्याने तसेच सागर व शिवम या दोघांचीही संघात निवड झाल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्गही आनंदी असल्याचे मत उपप्राचार्य प्रा. सोमनाथ स्वामी यांनी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी व सचिवा संगिता शहा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.