- दि. १२ जानेवारी रोजी ६८ लिंग प्रदर्शन
- दि.१३ जानेवारी रोजी अक्षता कार्यक्रम
- दि. १४ जानेवारी होम हवन
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : श्री सिद्धेश्वर महायात्रा दि. १२ ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत होत आहे. या यात्रा कालावधीत मंदिर, मंदिर परिसर व होम मैदान येथील मनोरंजन नगरीमध्ये संपूर्ण महिनाभर दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या यात्रा कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी श्री सिद्धेश्वर महायात्रेचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, ही महायात्रा शांततेत व नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी सबंधितांनी परस्परात समन्वय ठेवून सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिल्या.
नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्वर महायात्रा २०२५ अंतर्गत पूर्वतयारी आढावा बैठकीत उपविभागीय अधिकारी पडदुने बोलत होते. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी रेणूका पाटील, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क भाग्यश्री जाधव, पोलिस उपनिरिक्षक प्रकाश किणगी, विद्युत विभागाचे शाखा अभियंता यू.एस.पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता लेंगरे, महावितरण सोलापूर शहरचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता, सोलापूर महानगरपालिकेचे पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, यांच्यासह पोलीस व संबंधित विभागाचे अधिकारी तसेच देवस्थान पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
श्री सिद्धेश्वर माहायात्रा दि. १२ ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत होत असून, दि. १२ जानेवारी रोजी ६८ लिंग प्रदर्शन दि.१३ जानेवारी रोजी अक्षता कार्यक्रम दि. १४ जानेवारी होम हवन असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी पडदुणे यांनी दिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी पडदुणे पुढे म्हणाले, यात्रा कालावधीत मंदिर, मंदिर परिसर व होम मैदान या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख असावी. पोलीस विभागाने यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांची गर्दी विचारात घेता योग्य नियोजन करावे. होम मैदानावर होणाऱ्या मनोरंजन नगरीसाठी मंदिर समिती, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेने तसेच या ठिकाणी स्टॉल लावणारे विक्रेते यांना त्यांच्या स्टॉलसाठी किती जागा आवश्यक आहे, याची अचूक मागणी नोंदवून त्या पद्धतीने नियोजन करावे व सुरक्षेच्या दृष्टीने हे स्टॉल सुटसुटीत असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री सिद्धेश्वर महायात्रा कालावधी जवळपास एक महिन्याचा असल्याने या कालावधीत सर्वसामान्य नागरिक भक्तगण यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी वाहतूक विभागाने वाहन व्यवस्था पार्किंगची व्यवस्था, महानगरपालिका, मंदिर समितीने व अन्न सुरक्षा विभागाने अन्न पदार्थ तपासून घेणे व त्यांच्याकडील होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट वेळेत व योग्य ठिकाणी लावावी, त्यामुळे भाविकांच्या व सर्वसामान्यांचे आरोग्याच्या दृष्टिने हिताचे असेल, तसेच जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावून पोलिस विभागाने नागरिकांची सुरक्षेला प्राधान्य देऊन अवैध धंद्यांवर बारकाईने लक्ष ठेवावे.
अक्षता कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित राहतात त्या अनुषंगाने काटेकोर नियोजन करावे. सर्व संबंधित शासकीय यंत्रणा तसेच श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून ही महायात्रा शांततेत पार पाडावी. पंच कमिटीचे सदस्य कस्तुरे, बिराजदार यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान समिती वतीने यात्रा कालावधीत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली.