अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर: छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती; सर्व यंत्रणांनी जय शिवाजी जय भारत पदयात्रा यशस्वी करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे
रील स्टार,विद्यार्थी, नागरिक शिवप्रेमी, शासकीय, अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे. त्यानिमित्त केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यामध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रा राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या अनुषंगाने सोलापूर येथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय ते रंगभवन उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत हजारो विद्यार्थी, नागरिक, अधिकारी-कर्मचारी यांची “जय शिवाजी जय भारत पदयात्रा” आयोजित करण्यात आलेली आहे. तरी ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्यावर दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जय शिवाजी जय भारत पदयात्रा आयोजनाच्या पूर्व तयारी बाबतच्या बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी ठाकूर बोलत होत्या. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, तहसीलदार श्रीकांत पाटील, निलेश पाटील, किरण जमदाडे यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी ठाकूर म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी दहा ते अकरा या कालावधीत नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता ते रंगभवन उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापर्यंत हजारो विद्यार्थी, नागरिक यांची जय शिवाजी जय भारत पदयात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. प्रारंभी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या यात्रेनिमित्त हजारो विद्यार्थी, नागरिक अधिकारी, कर्मचारी यांच्याशी नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सकाळी ९.३० वाजता संवाद साधणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे मंडप व्यवस्था, स्क्रीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता पदयात्रेचा शुभारंभ होणार आहे. त्या दृष्टीने क्रीडा विभाग व अन्य संबंधित विभागाने पदयात्रा आयोजन यशस्वी होण्यासाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे, असे त्यांनी निर्देशित केले.
-
पोलीस विभागाने पदयात्रेदरम्यान वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी. पदयात्रेच्या मार्गावर इतर ठिकाणाहून वाहने येणार नाहीत, त्याअनुषंगाने चोख बंदोबस्त ठेवावा.
-
महापालिकेने पदयात्रा मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करावी.
-
या ठिकाणावर स्वच्छता राहील या दृष्टीने प्रयत्न करावेत.
-
आरोग्य पथके ही तैनात करावेत, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी ठाकूर यांनी दिल्या. आरोग्य, शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, पुरवठा विभाग, माहिती विभाग यांनी दिलेली जबाबदारी समन्वय ठेवून पार पाडावी.
-
क्रीडा विभागाने सर्व विभागात योग्य समन्वय ठेवावा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे मंडप व्यवस्था करावी. विद्यार्थी, नागरिकांना बसण्याची व्यवस्था करावी.
-
पंतप्रधान यांच्या संबोधनप्रसंगी आवश्यक यंत्रणा उभी करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी जय शिवाजी जय भारत पदयात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागावर देण्यात आलेली जबाबदारी सांगितले.सर्वांनी परस्परात समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन केले. महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी या यात्रेसाठी महापालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी जय शिवाजी जय भारत पदयात्रा व त्या अनुषंगाने अन्य बाबीची सविस्तर माहिती बैठकीत दिली.