विठ्ठल देखियेला डोळां..! सोलापुरात रंगणार भक्तीचा मेळा !

संतशिरोमणी सावता महाराजांसह अन्य संतांच्या रचनांवर आधारित भक्तीगीतांचा कार्यक्रम

  अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

 सोलापूर  :  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने संत शिरोमणी सावता महाराजांच्या अभंगांवर आधारित “विठ्ठल देखियेला डोळां” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार,  दि.  १७ मार्च रोजी संध्याकाळी ६.३० वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला  आहे. विठ्ठल देखियेला डोळा या सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची आहे. यावेळी  मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात संतशिरोमणी सावता माळी यांचे अभंग सादर केले जातील. महाराष्ट्रातील अन्य संतांच्या रचनाही सादर केल्या जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी श्रीक्षेत्र अरण येथील संत सावता महाराजांचे १७ वे वंशज ह.भ.प. रविकांत महाराज वसेकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अरण येथील विद्यार्थ्यांची दिंडी आणि श्रीफळ हंडीचा देखावा सादर करणार आहेत.

या कार्यक्रमात गायक विश्वास शाईवाले, उन्मेष शहाणे, श्रीराम पोतदार, वीणा बादरायणी, अपूर्वा शहाणे, स्वरदा मोहोळकर हे सर्वजण संत सावता महाराजांसह सर्व संतांच्या रचना सादर करतील. समीर जैन- रणदिवे, अविनाश इनामदार (सिंथेसायझर), उमेश मोहोळकर (तबला), सन्मित जैन रणदिवे (पखवाज), नंदकुमार रानडे (तालवाद्य) यांची साथसंगत लाभणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन माधव देशपांडे हे करणार आहेत.

सोमवार, दि. १७ मार्च रोजी संध्याकाळी ६.३० वाजता किर्लोस्कर सभागृहात होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. याचा सर्व सोलापूरकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक  बिभीषण चवरे  यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *