सोलापूर जिल्ह्यात रूप-टॉप सोलरचे ७९२६ अर्ज मंजूर तर २११५ चे काम पूर्ण

 जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद : जिल्ह्याच्या शेवटच्या घटकापर्यंत पीएम सूर्यघर योजनेची माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : पीएम सूर्यघर योजना ही भारत सरकारने सुरू केलेली एक महत्वकांक्षी योजना आहे. या अंतर्गत देशभरातील एक कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिट पर्यंत मोफत वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. तरी ही योजना सोलापूर जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंतच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचावी यासाठी वीज वितरण कंपनीने योग्य नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पीएम सूर्यघर योजना २०२४ जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने, कार्यकारी अभियंता आशिष मेहता, रमेश राठोड,  महाऊर्जा जिल्हा व्यवस्थापक प्रसन्न चित्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशादीन शेळकंदे उपस्थित होते.

  • जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की…

  • पीएम सूर्य घर योजना अंतर्गत आजरोजी पर्यंत महावितरणच्या पोर्टलवर ७९६९ अर्ज प्राप्त असून, त्यातील ७९२६ अर्जांना महावितरण्य मंजुरी दिलेली आहे. ५८११ सोलरचे काम सुरू असून, २११५ सोलरचे काम पूर्ण झालेले आहे. तरी उर्वरित रूप टॉप सोलरचे काम त्वरित मार्गे लावावे. जिल्ह्यातील अन्य पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वीज वितरण कंपनीने मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे प्रबोधन करावे. गावोगावी जाऊन आपल्या लाईन स्टाफमार्फत या योजनेचे महत्त्व नागरिकांना पटवून द्यावे. या योजनेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात काम करणाऱ्या वेंडरची स्वतंत्र बैठक आयोजित करावी, असेही त्यांनी सुचित केले.
  • सद्यस्थितीत या योजनेची बँकाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या बँक निहाय जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्याकडून उपलब्ध करून घ्यावी. तसेच सर्व बँकांशी एक स्वतंत्र बैठक या योजनेच्या अनुषंगाने घेऊन त्यांना या योजनेअंतर्गतची प्रकरणे विहित पद्धतीने त्वरित मंजूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.

प्रारंभी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी पीएम सूर्यघर योजना जिल्ह्यात कशा पद्धतीने राबवली जात आहे,  याविषयी माहिती दिली. वीज वितरण कंपनीकडून २११५ काम पूर्ण झालेल्या रूट ऑफ सोलरच्या माध्यमातून ७.६५ किलो वॅट  क्षमतेची वीज निर्मिती झाल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. तसेच सौर ग्राम योजनेअंतर्गत चिंचणी (पंढरपूर), धानोरे (माळशिरस), हिपळे (दक्षिण सोलापूर) या गावांची निवड करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

पीएम सूर्य घर योजनेविषयी-

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेची घोषणा केली. ही योजना रुफ टॉप सोलर योजना आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट दरमहा ३०० युनिट पर्यंत मोफत वीज पुरवठा करून १ कोटी घरांना प्रकाश देण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत शासन अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करेल त्यांना सवलतीच्या दरात बँक कर्जही दिले जाईल. यासाठी एक राष्ट्रीय ऑनलाईन पोर्टल तयार केले जाईल. यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा एकत्रित केल्या जातील एक प्रकारे हे पोर्टल इंटरफेस सारखे कार्य करणार आहे.

या योजनेचा शेवटच्या घटकापर्यंत प्रचार करण्यासाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या भागात ग्रुप टॉप सोलर सिस्टिमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रबोधित करण्यात येईल. या शिवाय उत्पन्न वाढवणे, विज बिल कमी करणे आणि लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा योजनेचा उद्देश आहे. पी एम सूर्यघर योजना ही भारत सरकारने सुरू केलेली अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे.

पात्रता-

या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःचे घर असणे आवश्यक आहे. घराच्या छतावर सोलर रुफ टॉप सिस्टिम बसवण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक असून कागदपत्रे जमा करणे ही आवश्यक आहे. अर्जदाराकडे वैद्य विद्युत कनेक्शन असावे. अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही तर सोलर पॅनल सबसिडीचा लाभ घेतलेला नसावा.

सबसिडी (अनुदान):-

  1. झिरो ते १५० युनिट पर्यंत विजेचा वापर, एक ते दोन किलो वॅट क्षमतेची सौर प्रणाली, सबसिडी तीस ते साठ हजार रुपये.
  2. १५० ते १५० युनिट पर्यंत विजेचा वापर, दोन ते तीन किलो क्षमता सौर प्रणाली, सबसिडी ६० ते ७८ हजार रुपये.
  3. ३०० पेक्षा जास्त युनिट विजेचा वापर, तीन किलो वॅट क्षमता सौर प्रणाली, सबसिडी ७८ हजार रुपये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *