जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार

पालकमंत्री जयकुमार गोरे :  सोलापूर येथून लवकरच विमान सेवा सुरू होणार

  • पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण 
  • जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला
  • जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यांतर्गत मोठ्या  प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार
  • नागरिकांना तंबाखू विरोधी दिन, कुष्ठरोग मुक्त भारतची शपथ

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : विकासाच्या   दिशेने   वाटचाल   करणारा   आपला  सोलापूर   जिल्हा  उद्योग, सामाजिक,  शैक्षणिक, आर्थिक,   वैद्यकीय, सांस्कृतिक  आणि पर्यटन क्षेत्रात  चौफेर  प्रगती   करत  असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी  सहकार्य  केले  जाईल, अशी  ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा  ७६ वा समारंभानिमित्त पोलीस आयुक्त मुख्यालय पोलीस परेड ग्राउंड येथे सकाळी ९.१५ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले-तेली,  शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आ. देवेंद्र कोठे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक व अन्य मान्यवर नागरिक उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज रोजीपर्यंत सोलापूर जिल्ह्यात एकूण ११ लाख २० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १० लाख ५५ हजार अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी दि. १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींसाठी शासनाने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आज रोजीपर्यंत लेक लाडकी योजनेअंतर्गत ६ हजार १४४ लाभार्थी बालिकांना लाभाच्या पहिल्या टप्प्याची रक्कम प्रति बालिका ५ हजार रुपयेप्रमाणे ३ कोटी ७ लाख २० हजार लाभार्थी बालिका व मातेच्या संयुक्त बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे, अशी माहिती पालकमंत्री  गोरे यांनी दिली.

सोलापूर जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल. येथून होणारे स्थलांतर ही थांबण्यास मदत होणार आहे.  राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्याच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी एकूण २८२.७५ कोटीचा निधी मंजूर केलेला आहे.

श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात. परंतु भाविकांना दर्शनासाठी खूप वेळ दर्शन रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे दर्शन मंडप व दर्शन रांग याकरिता १२९.४० कोटीचा आराखडा शासनाने मंजूर केला असून, ही कामे लवकरच सुरू होणार आहेत. पंढरपूर देवस्थान मंदिर विकासाकरिता ७३.८५ कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आलेला असून, या अंतर्गत कामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा लाभ भाविकांना मिळणार असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.

सोलापूर येथून लवकरच विमान सेवा सुरू होणार आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसात उद्दिष्टपुर्ती कार्यक्रमाचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच केंद्र व राज्य शासन बेघरांना स्वतःचे घरकुलाचे स्वप्न पूर्ती करण्यासाठी प्रयत्नशील असून, जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना व अन्य सर्व आवास योजनेचे अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२४-२५ आर्थिक वर्षात ७०२ कोटी निधी मंजूर आहे. या सर्व निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे घेण्यात आलेली आहेत. बेटी बचाओं बेटी पढ़ाओ ही योजना राबविण्यात येते. या योजनेला दि.२२ जानेवारी २०२५ रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. महिला व बालविकास विभागाच्यावतीने जिल्ह्यात दि.२२ जानेवारी २०२५ ते दि.८ मार्च २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रबोधन करावे, असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी केले.

  •  जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून संपूर्ण जिल्हा पाणीदार करण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले.
  • कृषी क्षेत्रातील कृषी विषयक माहिती आणि डिजिटल सेवा देण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे त्यांनी सुचित केले.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरात एक लाख मराठा उद्योजक बनवण्याचे संकल्प पूर्ती झालेली आहे.
  • प्रत्येक घरावर सौर ऊर्जा पॅनल बसवून प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सहभागी होण्याचे आवाहनही पालकमंत्री  गोरे यांनी केले.

पोलीस परेड ग्राउंड येथे सकाळी ठीक नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी परेड कमांडर परिविक्षा दिन पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा वी. एस. यांच्यासमवेत परेड संचलन केले.  त्यानंतर पथसंचलन झाले.  यावेळी भारतीय उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. पालकमंत्र्यांनी यांनी सर्व उपस्थित नागरिकांना तंबाखू विरोधी दिन व कुष्ठरोग मुक्त भारत बाबत शपथ दिली. त्यानंतर पोलीस विभाग, कृषी विभाग, सैनिक कल्याण विभाग, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण, क्रीडा विभागाचे पुरस्कार वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, ज्येष्ठ नागरिक अन्य मान्यवर नागरिक यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *