मेंदू मृत व्यक्तीचेच अवयवदान; नेत्रदान, देहांगदान मृत्यूनंतर केला जातो : योगीन गुर्जर
श्री मार्कंडेय सोशल फाऊंडेशन, पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय, पद्मशाली सखी संघमचा विधायक उपक्रम
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापुरात दि. १३ ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिनानिमित्त जीवनदान देणा-या नातलगांचा सन्मान करण्यात आला. श्री मार्कंडेय सोशल फाऊंडेशन, पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय, पद्मशाली सखी संघम यांनी हा विधायक उपक्रम राबविला. पलगंटी, अंजीखाने, इप्पलपल्ली, गुर्रम या अवयवदान केलेल्या कुटुंबियांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कै. सतीश पलगंटी यांच्या मृत्युनंतर अवयवदान केलेल्या त्यांच्या पत्नी कल्पना पलगंटी, रामचंद्र अंजिखाने यांचे देहदान करण्यात आले होते. त्यांचे पुत्र ज्ञानेश्वर (देवा) अंजिखाने, पुष्पावती इप्पलपल्ली यांच्या मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. त्यांचे चिरंजीव प्रवीण जयप्रकाश इप्पलपल्ली आणि चेतन गुर्रम यांच्या मृत्युनंतर नेत्रदान करण्यात आले होते. त्यांचे बंधू लक्ष्मीनारायण गुर्रम अशाप्रकारे चौघांची सोलापुरी टॉवेल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
‘अवयवदान’ हे मेंदू मृत (ब्रेन डेथ) झालेल्या व्यक्तीचेच केला जातो. यासंदर्भात समाजामध्ये समज – गैरसमज आहेत. याची माहिती प्रत्येकांने घेऊन या संदर्भात चळवळ उभी करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था व दधिची अवयवदान प्रचारक संघ या संस्थेचे सक्रीय कार्यकर्ते योगीन गुर्जर यांनी केले आहे.
योगीन गुर्जर पुढे म्हणाले, देहदान, नेत्रदान व अवयवदान यामध्ये ढोबळ स्वरुपात तीन भाग आहेत. अवयवदान व देहदान – नेत्रदान यामध्ये फरक आहे. ‘देहदान’ हे नैसर्गिक मृत्यू झाल्यावरच केले जाते. सदरच्या व्यक्तीवर कोणल्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया केली नसावी. गंभीर स्वरुपाचे किंवा कॅन्सरसारखे आजार असू नयेत. अशा व्यक्तीचेच देहदान संबंधित यंत्रणेकडून स्वीकारले जाते. ‘नेत्रदान’ही मृत्यूनंतरच डोळे संपूर्ण न काढता केवळ वीस मिनिटात विशिष्ट प्रकारात काढून एका मृत व्यक्तीचे किमान चार गरजू व्यक्तींना नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लावतात. यासंदर्भात तज्ञ डॉक्टर्स सोलापुरात मोजकेच आहेत. त्यापैकी डॉ. तन्वांगी जोग आहेत. मेंदू मृत झाल्यास किंवा व्हेंटीलेटरवर असलेल्या व्यक्तीचेच अवयवदान करण्यात येत असल्याने मृत व्यक्तीचे इच्छा किंवा कुटुंबाचा निर्णय असल्यास रितसर पध्दतीने करण्यात येतो.

सोलापुरात दि. १३ ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून श्री मार्कंडेय सोशल फाऊंडेशन, पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय आणि पद्मशाली सखी संघमच्यावतीने आयोजित केलेल्या उपक्रमात जीवनदान देणा-या नातलगांचा सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जोग नेत्रपेढीच्या डॉ. तन्वांगी जोग, वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, अरविंद चिन्नी, फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम, सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम उपस्थित होते.
-
यावेळी जोग नेत्रपेढीच्या डॉ. तन्वांगी जोग म्हणाल्या, पैशाने श्रीमंत असण्याची आवश्यकता नाही. फक्त मनाने श्रीमंती आणि दान देण्याचे भाव असणे फार महत्वाचे आहे. म्हणून नेत्रदान, अवयवदान व देहांगदान हे सध्याच्या परिस्थितीत काळाची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांचा सत्काराचा कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम आहे. ज्या कुटुंबातील व्यक्तींनी नेत्रदान, अवयवदान आणि देहदान केले आहे, असे कुटूंब इतरांना प्रोत्साहीत करणारे आहेत.
प्रास्ताविक, स्वागत व सूत्रसंचालन सखी संघमच्या समन्वयिका कला चन्नापट्टण, आभार प्रदर्शन फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम यांनी केले. याप्रसंगी श्रीनिवास कामुर्ती, किशोर व्यंकटगिरी, वैकुंठम् जडल, श्रीनिवास पोटाबत्ती, वनिता सुर्रम, ममता तलकोक्कुल, गीता भूदत्त, पद्मा मेडपल्ली, पल्लवी संगा यांचे सहकार्य लाभले.
