मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या रेल्वेला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दाखविला हिरवा झेंडा
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिकांना ओरिसा येथील श्री जगन्नाथ पुरी दर्शनासाठी रवाना झाले आहेत. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिकांना ओरिसा येथील श्री जगन्नाथ पुरी दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाडीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर रेल्वे स्टेशन येथे फित कापून तसेच रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ही रेल्वे श्री जगन्नाथ पुरी कडे प्रयाण झाले. या तीर्थयात्रेचा कालावधी दि. ११ ते १६ फेब्रुवारी २०२५ असा असणार आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ओरिसातील श्री जगन्नाथ मंदिर पुरी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील ८०० जेष्ठ नागरिकांना सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, रेल्वे विभागाचे मॅनेजर सोना, वैद्यकीय अधिकारी ऋतुजा व्हटकर, समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या योजनेअंतर्गत श्री जगन्नाथ पुरी कडे जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी तीर्थ दर्शनासाठी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण यात्रा कालावधी समाज कल्याणचे अधिकारी कर्मचारी तसेच वैद्यकीय स्टाफसोबत असून, या अनुषंगाने काही तक्रार असेल तर तात्काळ संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी समाज कल्याणच्या सहाय्यक सोनवणे यांनी ओरिसा येथील पुरी या ठिकाणी असलेल्या श्री जगन्नाथ मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या कालावधीत या नागरिकांसोबत असलेल्या वैद्यकीय स्टाफ व समाज कल्याणच्या स्टाफ ची ओळख संबंधितांना करून देण्यात आली. दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ९.३0 वाजता या नागरिकांना घेऊन रेल्वेने पुरीकडे प्रस्थान केले.
” देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर र्धार्मयांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे पुण्य कर्म म्हणून आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. ही बाब विचारात घेवून सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सुरू करण्यात आली आहे.
पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये श्री. जगन्नाथ मंदिर, पुरी ओरिसा या ठिकाणासाठी तीर्थदर्शनाकरिता पात्र ८०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानुसार सोलापूर ते श्री जगन्नाथ मंदिर, पुरी ओरिसा या ठिकाणी दि. ११ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२५ रोजी या कालावधीत तीर्थ दर्शनास जाण्याकरिता मान्यता मिळालेली आहे.
या नियोजित तीर्थदर्शनाच्या यात्रेदरम्यान वैद्यकीय अधिकारी ऋतुजा व्हटकर आणि पॅरामेडीकल स्टाफ (नर्स), सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील दहा अधिकारी, कर्मचारी सोबत असणार आहेत. तीर्थ दर्शनास जाण्याकरिता रेल्वे आरक्षित करण्यात आली होती, अशी माहिती समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिली.
- नागरिकांमध्ये आनंद, उत्साह :
- तीर्थ दर्शनासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह, आनंद व श्री जगन्नाथ यांच्या भेटीची ओढ दिसून येत होती. तर ही भेट, हे दर्शन राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून होत असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झालेला दिसून येत होता.