सोलापूरला लवकरच नव्या कोऱ्या बस उपलब्ध करून देणार!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक : राज्य शासन दरवर्षी ५   हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षात २५ हजार नव्या बस खरेदी करणार

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर :  राज्य शासन दरवर्षी पाच हजार बसेस याप्रमाणे पुढील पाच वर्षात 2५ हजार नवीन बसगाड्या खरेदी करणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आगारांना नवीन बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सोलापूर विभागातील प्रत्येक आगारालाही लवकरच नव्या बस उपलब्ध करून दिल्या जातील. सध्या बार्शी आगाराला  १० नव्या बसेस मिळाल्या असून, अशाच उर्वरित ८ आगारांनादेखील नवीन बसेस देण्यात येणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सोलापूर बस स्थानकामधील प्रसाधनगृहाची पाहाणी केली. प्रवासासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह या बाबतीत अधिकाऱ्याशी चर्चा केली. यावेळी अनेक कर्मचारी व प्रवासी संघटनांनी बसेस, बसस्थानक व कर्मचाऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात निवेदने सादर केली.  या भेटी दरम्यान एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी व अन्य अधिकारी, कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक आमदार विजय देशमुख यांनी  मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन बसस्थानक सुधारणा व बसेसच्या कमतरतेबाबत चर्चा केली. लवकरात लवकर सोलापूर विभागाला नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री सरनाईक यांनी आमदार देशमुख यांना दिली.

येत्या ५ वर्षात २५  हजार बसेस घेणार :

परिवहन मंत्री  सरनाईक म्हणाले ” राज्य शासनाने दरवर्षी ५ हजार नवीन कोऱ्या एसटी बस महामंडळाला घेऊन देण्याचे निश्चित केले आहे. याप्रमाणे पुढील पाच वर्षात २५ हजार बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. जेणेकरून भविष्यात सर्व सामान्य प्रवासी जनतेचा प्रवास अत्यंत सुखकर आणि सुरक्षित होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *