मराठीचे भवितव्य: आपली जबाबदारी
“माय मराठी भाषा नांदावी आपल्या ओठावर तिचे आषाढ मेघ बरसावे आपल्या जीवनावर
इथे तिथे वाचता यावा तिच्या अक्षरांचा चेहरा
तिच्या अमृतशब्दांना करावा मानाचा मुजरा”
सोलापूर : मराठी भाषेला मानाचा मुजरा करावा इतपत आपली भाषा समृध्द आहे. मराठी भाषा प्राचीन साधरणपणे २४०० वर्षाची भाषा आहे. बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी तिचे अस्सल गुणगौरव गायले आहे. भारतात मराठी भाषा ही तिसऱ्या क्रमांकाची आहे. जवळपास १५ कोटी लोक ही भाषा व्यवहारात बोलली जाते. मराठी भाषेतून ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले मराठीत साहित्यिक आहेत. महाराष्ट्रात तिला महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे.
मराठी भाषेत एका शब्दांचे अनेक अर्थ उपलब्ध आहेत. भाषेमध्ये लवचीकता हा तिचा मुलभूत अंश आहे. तसे इतर भाषेमध्ये याचा वनवा आहे. तिचा मार्दव गोडवा आपणास अधिक भावतो. भाषेचा वापर ही मुख्यता: आपल्या घरातून सुरूवात व्हायला हवी. मराठी माणूस भेटल्यानंतर अथवा रिक्षा टॅक्सीवाले यांच्याशी आपण मराठीतच बोलले पाहिजे. रस्त्यावरचा व्यावसायिक पाट्याही मराठीत असाव्यात. बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन जिथे-जिथे लोकांचा समूहाने वावर असतो, तिथे मराठी भाषा आपण बोलली पाहिजे. मराठी साहित्य, ग्रंथ, शाळा, शिक्षण, वर्तमानपत्र, दूरदर्शन, मराठी मालिका, चित्रपट, यामुळेही आपली भाषा समृध्द होते. शासकीय कार्यालय व न्याय व्यवस्थेमध्ये मराठी भाषेचा वापर व्हायला हवा. जे काही थोडे बहूत इंग्रजी शब्द मराठीत रूजलेत ते तसेच राहिले तरी मराठी भाषा उन्नत होईल. लहान मुलांना मराठी गोष्टीचे चांदोबा, इसाब निती, राष्ट्रपुरूष, महापुरूष, थोर व्यक्तींचे चरित्र पुस्तके वाचायला द्यायला हवी. आपण मराठीतून कथा सांगायला हव्यात. मुलांना बाजारातून फिरवताना त्यांस विविध वस्तुंची नावे मराठीतूनच सांगायला हवीत.
मराठी भाषा बोलण्यामुळे आपणास कमीपणा येतो ही न्यूनगंडाची भावना आपण दूर करायला हवी. वास्तवीक पाहता आपण इतरांना मराठी भाषेची गोडी लावायला हवी, प्रोत्साहीत करायला हवे. मराठी भाषेतील ज्ञान आपणास अचंबीत करेल, इतके विविध विषयातील अफाट शब्द भांडार आहे. दि. १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन व दि.२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून विविध मराठी संस्था साजरा करतात. त्यात आपण हिरहिरीने भाग घ्यायला हवा. मराठी भाषा संवर्धन करायला हवी. हे आपले आद्य कर्तव्य आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, त्यामुळे मराठी भाषेला नवचौतन्य मिळेल. यासाठी सर्वसामान्य मराठी माणसाने शासनाकडे पाठपुरावा करायला हवा. महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद शाखेने जोमाने काम करायला हवे. जेणेकरून मराठी भाषेला गतवैभव प्राप्त होईल. मराठी भाषेचे संवर्धन होईल.
मराठी भाषेमध्ये अहिराणी, माणदेशी, मालवणी, कोळी, कोल्हापुरी, चंदगडी, बोली, बेळगावी, मराठवाडी, नागपुरी, वराडी, जाडी बोली , तंजावर मराठी, नारायणपेठी बोली, भटक्या विमुक्त या ही मराठी मातृ भाषेच्या संलग्न भाषा जतन व्हायला हवीत. वरील सर्व बोलीभाषेतील साहित्यीक आपल्या परीने लिखानातून व्याख्यानातून भाषेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्य शासन ही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध निर्णय घेत आहे. शासकीय व्यवहारात मराठी भाषा वापरण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत. त्याची ही अंमलबजावणी काटेकोरपणे केल्यास मराठी भाषाचे उत्कृष्ट संवर्धन होईल, असे वाटते.
संत ज्ञानेश्वर यांचे बोलच मराठीला तारतील.
माझा मराठीची बोलू कौतुके!
परी अमृतातेही पैजासी जिंके!
ऐसी अक्षरे रसिके! मेळवीन!!
: मारूती कटकधोंड; (संपर्क क्रमांक- ९८८११२४४५०)