साखर उद्योगातील कर्मचारी वर्गांचा अलौकिक एकतेचा नवा उत्सव: क्रिकेट खेळाच्या माध्यमातून साखर उद्योगातील कर्मचारी वर्गांनी जोपासली खिलाडूवृत्ती!
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर साखर उद्योगातील कर्मचारी वर्गांचा अलौकिक असा एकतेचा नवा उत्सव सुरु झाला आहे. क्रिकेट खेळाच्या माध्यमातून साखर उद्योगातील कर्मचारी वर्गांनी जोपासली खिलाडूवृत्ती जोपासताना दिसत आहेत. निमित्त आहे… महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना एकत्र आणणारी, खेळाच्या उत्साहात न्हाऊन निघालेली महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५ क्रिकेट स्पर्धा.
एरव्ही ट्रॅक्टर–ट्रॉली, उसतोड कामगार अन त्यांची टोळी, ढवल्या-पवळ्या अशी बैलजोडी आणि रांगेने कारखान्यांकडे हर्र हर्र… आणि चक चक.. अशा बैलांच्या जोडीला अधून मधून साद घालणारे गाडीवान, सर्र… सर्र… अशा कर्कश आवाजात एका गतीने सात-आठ ऊसतोड कामगारांच्या बैलगाड्यांच्या ताफा, अधून मधून ऊसाने भरलेल्या गाडीवर सवार माय-माऊलींची आपल्या कुशीत रडणाऱ्या चिमुरडीना मायेची साद घालणारी, मायेने लेकरांना आपल्या कुशीत घेणाऱ्या त्यामाऊलीची माया आणि प्रेमळ भावना, अशा मनाला स्पर्श करणारे दृश्य एरव्ही जरी दुर्मिळ झाले असले तरी कधीकाळी आपल्या सुखद नयनांनी तो पाहिलेला दृश्य आणि त्या आठवणीन मनाला नक्कीच सुखद अनुभव आला… तो साखर उद्योगातील कर्मचारी वर्गांनी भरवलेल्या या उत्साही आणि सांघिक अशा क्रिकेट खेळाच्या माधमातून.

सिताराम साखर कारखान्याचे दूरदृष्टी असलेले कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांच्या प्रेरणेने साकारलेली ही लीग म्हणजे केवळ एक स्पर्धा नसून, साखर उद्योगातील बांधिलकी, मैत्री आणि सामंजस्याचा एक अद्वितीय सेतूचं म्हणावं लागेल. ही स्पर्धी साखर क्षेत्रातील कर्मचारी वर्ग, व्यक्तींना एकत्र आणून एक नवीन बंध निर्माण करणारी एक पर्वणी ठरत आहे. उद्घाटन समारंभ सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक बनला होता. मान्यवरांनी ट्रॉफीचे अनावरण करण्यात आहे. या २०२५ च्या क्रिकेट लीगची ट्रॉफी सुद्धा, या लिग प्रमाणे प्रतिकात्मक बनवण्यात आली आहे. ट्रॉफीवर ऊसाचे तीन स्टंप आहेत, जो की साखर क्षेत्रातील प्रत्येक घटकाच्या सन्मानार्थ ते ऊसाचे स्टंप दाखवण्यात आले आहेत, ज्यावर क्रिकेटचा बॉल, क्रिकेटचे नवीन पर्व आरंभिले आहे. याचे प्रतीक आहे.

याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सुयोग गायकवाड म्हणाले… “ही स्पर्धा केवळ खेळ नाही, तर साखर उद्योगातील प्रत्येक व्यक्तीला जोडणारा एक भावनिक धागा आहे. यातून सोलापूर जिल्ह्याचा सामाजिक आणि औद्योगिक बंध अधिक दृढ होईल. हा एक सुंदर अनुभव असेल.” दयानंद कॉलेजच्या मैदानावर दि. १० ऑगस्टपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत.

मनोरंजनाने सजलेला सोहळा:
मराठी सिनेसृष्टीतील चमकते तारे हृता दुर्गुळे, भाग्यश्री लिमये आणि हेमल इंगळे यांनी त्यांच्या उपस्थितीने सोहळ्याला ग्लॅमरचा स्पर्श दिला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील प्रतिभावान कलाकारांनी सादर केलेल्या विनोदी प्रहसनाने तर संपूर्ण मैदान हास्याच्या लाटांनी दुमदुमले. सोलापूरकर प्रेक्षकांनी या हास्यपर्वाचा मनसोक्त आनंद लुटला. या भव्य सोहळ्याला हजारो क्रिकेटप्रेमी आणि साखर उद्योगाशी संबंधित मान्यवरांनी हजेरी लावली. ज्यामुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५ ही केवळ एक क्रिकेट स्पर्धा नाही, तर औद्योगिक ऐक्य, सामाजिक सोहाद आणि निखळ खेळवृत्तीचा एक अप्रतिम संगम आहे, जो महाराष्ट्रात एक नवा आदर्श निर्माण करत आहे.
या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला ३ लाख रुपये, उपविजेत्याला २ लाख आणि तिसरा क्रमांकासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. ‘मॅन ऑफ द सिरीज’साठी एक धमाकेदार ईलेक्ट्रिक स्कूटर, उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाजसाठी प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

