विविध क्षेत्रातील मान्यवरांचा झाला सन्मान
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : अश्विनी सहकारी रूग्णालयाचे प्रमुख विश्वस्त बिपीनभाई पटेल यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी लागणारी व्हीलचेअर चौधरी फाउंडेशनला भेट दिली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांचा जिल्हास्तरीय मेळावा द्वारकाधीश मंदिर, जुळे सोलापूर येथे झाला. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर व चौधरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा व विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी प्राधिकरण, उत्कर्ष देवर्षी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, प्रा. गोरख देशमुख, दिलीपभाऊ कोल्हे, हेमंत चौधरी, प्रादेशिेक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते, विश्वनाथ गायकवाड उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देवून गौरवण्यात आले.
न्यायाधीश उत्कर्ष देवर्षी यांनी ज्येष्ठ नागरिक व त्यांचे कायदेशीर अधिकार याविषयी मार्गदर्शन केले. समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी उपस्थितांची सामुहिक शपथ/ प्रतिज्ञा घेण्यात आली. आभार प्रदर्शन चौधरी फाउंडेशनचे अध्यक्ष चेतन चौधरी यांनी केले.