सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी २८२.७५ कोटी मंजूर

 उच्चाधिकार समितीकडून मिळाली मंजुरी; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती

 by assal solapuri ||

सोलापूर : सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल आणि येथून होणारे स्थलांतर ही थांबेल. त्यामुळे उजनी जल पर्यटन १९० कोटी १९  लाख, कृषी पर्यटन १९ कोटी ३० लाख, विनयार्ड पर्यटन ४८ कोटी २६ लाख, धार्मिक पर्यटन २५  कोटी असा एकूण २८२.७५ कोटीचा कोटींचा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुंबई येथे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार  समितीकडे सादर केला. समितीकडून या आराखड्यासाठी २८२.७५ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.  या बैठकीसाठी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीमध्ये प्रथम सादर करण्यात आला. जिल्ह्याच्या पर्यटनाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या बाबी यात नमूद करून त्यासाठी लागणारी तरतूद करून हा आराखडा समितीने मंजूर केला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला मान्यता प्रदान केली. तर माहे जून २०२४ मध्ये पुणे येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्याकडे हा पर्यटन आराखडा सादर केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री यांनी या आराखड्याला तत्वत: मंजुरी दिलेली होती.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेला हा आराखडा उच्चाधिकार समितीकडे पाठवण्यात आला. आज मुंबई येथे राज्याच्या मा.मुख्य सचिव श्रीमती सुनिता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने या आराखड्यातील बाबींचे बारकाईने माहिती घेऊन यातील २८२.७५ कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजुरी प्रदान केली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याचे उच्चाधिकार समितीसमोर पीपीटीद्वारे सादरीकरण केले. हे सादरीकरण करत असताना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती तसेच पर्यटनासाठी खूप महत्त्वपूर्ण जिल्हा असल्याची माहिती देऊन हा आराखडा मंजूर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था वेगाने वाढण्यास मदत होईल. तसेच, येथून होणारे स्थलांतर रोखले जाईल यासाठी हा प्रकल्प खूप महत्त्वाचा असल्याचे समितीला जिल्हाधिकारी यांनी पटवून दिले.

राज्यासाठी पथ दर्शक प्रकल्प –

 जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उच्चाधिकार समिती समोर सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याचे ज्या पद्धतीने सादरीकरण केले. तसेच, या आराखड्यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटनाच्या दृष्टीने अंतर्भूत केलेल्या बाबी किती महत्त्वपूर्ण आहेत याची जाणीव समितीला झाली. आराखड्याची मांडणी व सादरीकरणाबद्दल उच्चाधिकार समितीच्या अध्यक्ष तथा मुख्य सचिव व अन्य सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे विशेष कौतुक केले. तसेच, हा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शक असेल, असेही समितीने सांगितले.   

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *