प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी : छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेस शिवभक्तांची गर्दी
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : श्री शिवचरित्रातील आग्र्याहून सुटका ही घटना म्हणजे राजनीतीशास्त्रातील सूक्ष्म नियोजनाचे सर्वोत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन छत्रपती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंद देव गिरीजी यांनी केले.
३५० व्या श्री शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त समस्त हिंदू समाजातर्फे जुनी मिल कंपाउंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये दि/ २५ सप्टेंबरपर्यंत आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेच्या सहाव्या दिवशी मंगळवारी प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी मार्गदर्शन केले. ‘शिवचातुर्य’ या विषयावर बोलताना त्यांनी आग्र्याहून सुटका, छत्रसाल बुंदेला यांना प्रेरणा, गड आला पण सिंह गेला आदींवर विवेचन केले.
प. पू. स्वामी गोविंद देव गिरीजी म्हणाले, पुरंदरच्या तहानुसार छत्रपती श्री शिवराय औरंग्याला भेटण्यासाठी आग्रा येथे गेले. कपटी औरंग्याने त्यांना विश्वासघाताने कैद केले. मात्र ३५० मावळे, २०० घोडे, ८ हत्तीपैकी एकही जीव न जाता तब्बल ५ हजार सैनिकांच्या पहाऱ्यातून स्वतः ची सुटका करुन घेणे हे जगाच्या इतिहासात अजोड कार्य आहे.असंख्य नरवीरांच्या त्यागातूनच हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. श्री शिवचरित्राचे पारायण घरोघरी करणे आवश्यक आहे, असेही प. पू. स्वामी गोविंद देव गिरीजी यांनी सांगितले. प्रास्ताविक सी. ए. राजगोपाल मिणीयार यांनी तर सूत्रसंचालन गुरुशांत धुत्तरगावकर यांनी केले.