सोलापुरातील ५०० लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र!

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा – दोन : सोलापूर जिल्ह्यातील ६२ हजार ९६७ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र, पहिला हप्ता वितरनाचे आदेश

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा – २ या योजनेअंतर्गत राज्यातील २० लक्ष लोकांना घरकुल मंजुरी पत्र व १० लक्ष लोकांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रम बालेवाडी- पुणे येथे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील ६२ हजार ९६७ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र व वितरण आदेश आज देण्यात आले.   सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते जिल्ह्यातील ५००  लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र व वितरण आदेश देण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.   यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र देण्यात आले. घरकुल योजनेचा पहिला हप्ता पंधरा हजार रुपये ऑनलाईन बटन दाबून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा ऐतिहासिक कार्यक्रम असून, गरिबांना आपल्या हक्काचं स्वप्नातलं घर मिळत आहे. महाराष्ट्र राज्यात पहिल्या टप्प्यामध्ये १३.५७ लाख लोकांना घरकुले मिळाली.  दुसऱ्या टप्प्यामध्ये २० लाख लोकांना घरकुल मोदीजींनी मिळवून दिले आहेत. ग्रामविकास विभागाने  २० लाख घरांचे ४५ दिवसात मंजुरी पत्राचे काम पूर्ण केले आहे. हा ऐतिहासिक कार्यक्रम ३५१ पंचायत समिती, २८ हजार ग्रामपंचायतीमध्ये लाईव्ह चालू आहे. उरलेल्या दहा लाख घरकुल लाभार्थ्यांना पुढच्या पंधरा दिवसात पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.  या मोफत मिळणाऱ्या घरकुलांना वीज सोलरद्वारे मोफत मिळणार असून, नळ कनेक्शनही मोफत देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या व्यतिरिक्त इतर योजनेअंतर्गत १७ लाख घरकुल लोकांना देण्यात येतील. यासाठी ७० हजार कोटी रुपये गुंतवणूक महाराष्ट्र शासनाने केलेली आहे.  मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकास विभागांतर्गत काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांचे आणि कर्मचारी यांचे मनापासून अभिनंदन  केले. या घरकुलांच्या निर्मितीसाठी पाच ब्रास रेती मोफत देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री यांनी दिले.

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वीस लाख लोकांना घर मिळणं आणि दहा लाख लोकांना एकाच वेळी पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणारं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे, याचा सर्वांना आनंद आहे.  महाराष्ट्र सरकारच्या हा गौरव असून सर्व गोरगरीब बेघर लाभार्थ्यांना घरकुल बरोबरच गॅस, वीज, पाणी, शौचालय हे मोफत मिळणार आहे. ज्यांना घरकुलासाठी जागा नाही, अशा लाभार्थ्यांना सरकारनं जागाही मिळवून देण्या बद्दल अमित शहा यांनी सरकारचे अभिनंदन केले.  येणारी दिवाळी सण हे आपल्या हक्काच्या घरात साजरी होणार असल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तसेच राज्यातील बेघर- गरजू गोरगरीब लोकांना घरकुल देऊन त्यांची भीष्म प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण केली, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मत व्यक्त केले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण टप्पा-२ या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार च्या ग्रामविकास विभागाने सोलापूर जिल्ह्यातील ६२९६७ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र देण्यात आले. पुणे येथे होणाऱ्या या कार्यक्रमाबरोबर सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पंचायत समितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.

सोलापूर शहरात नियोजन भवन येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ  या चार तालुक्यातील ५०० लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात घरकुल मंजुरी पत्र देण्यात आले.  यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील गोदावरी बने, शिवानंद शंकर पाटील, परवीन युन्नूस गारीवर या लाभार्थ्यांना घरकुल मंजूरी पत्र कुलदीप जंगम यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉ. सुधीर ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कुलदीप जंगम,  गट विकास अधिकारी रतिलाल साळुंखे,  जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *