२५ व्या वर्षी ‘इलेक्ट्रो’ प्रदर्शन महावितरणच्या विजेवर; महावितरणकडून ५१५ किलोवॅट क्षमतेची वीजजोडणी
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : होम मैदानावर सुरु असलेल्या ‘इलेक्ट्रो’ या प्रदर्शनाला पहिल्यांदाच महावितरणच्या वीज जोडणीचे ‘बुस्ट’ मिळाले आहे. आजवर हे प्रदर्शन डिझेल जनरेटरवर भरवले जात होते. त्यामुळे हजारो लिटर डिझेला खर्च तसेच त्यापासून होणारे ध्वनी व वायू प्रदूषण यापासून सोलापुरकरांना दिलासा मिळाला आहे. याच प्रदर्शनात महावितरणनेही स्टॉल उभारुन विविध योजनांचा प्रचार-प्रसार सुर केला आहे.
सोलापूर शहरात दि. १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होम मैदानावर ‘इलेक्ट्रो’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सन १९९९ पासून सुरु झालेल्या प्रदर्शनाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. लाखो नागरिक या प्रदर्शनाला भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेतात. या प्रदर्शनाला आयोजकांकडून दरवर्षी जनरेटरवर वीजपुरवठा करण्यात येत होता. त्यासाठी मोठा खर्च व्हायचा. तसेच त्यातून ध्वनी व वायू प्रदुषणही व्हायचे. परंतु, यावेळी आयोजकांनी वीजपुरवठ्याकरिता महावितरणच्या सोलापूर मंडल कार्यालयाशी संपर्क केला. तेव्हा अधीक्षक अभियंता सुनील माने व शहर विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांच्या पुढाकारातून प्रदर्शनाला केवळ दोन दिवसांत एकूण ५१५ किलोवॅट दाबाचा वीजपुरवठा ६ वीजजोडण्यांद्वारे करण्यात आला.
‘इलेक्ट्रो’ प्रदर्शनात स्टॉल क्र. ४ च्या माध्यमातून महावितरण प्रधानमंत्री सूर्यघर- मोफत वीज योजना, मागेल त्याला सौरकृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, अभय योजना आदी योजनांचा प्रसार करत आहे. सर्व वीज ग्राहकांनी या स्टॉलला मोठ्या संख्येने भेट देऊन विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण सोलापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी केले आहे.