दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून धनगर समाजालाच उमेदवारी मिळावी

राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय संस्था व जन्मोत्सव मंडळाने केली मागणी

by assal solapuri ||

सोलापूर:  २५१ दक्षिण सोलापूर  विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पक्षाकडून धनगर समाजालाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय संस्था व जन्मोत्सव मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सिद्राम चोपडे, ज्येष्ठ सल्लागार अप्पाराव हाके, रावसाहेब व्हनमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

जर येत्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजास विधानसभेत तिकिट दिले गेले नाही तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षास फार मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या धनगर समाजाची लोकसंख्या ही सुमारे दोन कोटी इतकी आहे. परंतु आज महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाचा धनगर समाजातील एकही आमदार नाही. काँग्रेस पक्षाकडून या समाजास जनगणनेच्या अहवालानुसार संपूर्ण महाराष्ट्रातून जात निहाय जनगणनेनुसार धनगर समाजास विधानसभेचे तिकिट देण्यात यावे. अशी मागणी नमूद करण्यात आली.

=======================================================================================

दक्षिण सोलापूरचे आमदार कै. आनंदराव देवकते हे काँग्रेस पक्षासाठी सतत झटले आहेत.  काँग्रेस पक्षासाठी ते  सदैव अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिले आहेत. तरी कॉंग्रेस पक्षास याबाबत आत्मचिंतन करणे अतिशय गरजेचे आहे. आतापर्यंतच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अनुकूल वातावरण असूनदेखील काही ठिकाणी धनगर समाजास तिकीट नाकारले गेले आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाजाचा एकही खासदार नसल्याने महाराष्ट्र राज्यातील सर्व धनगर समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यात धनगर समाजाचा सिंहाचा वाटा आहे.

====================================================================================

दरम्यान, गुरुपोर्णिमेपासून गेल्या महिनाभरात संपूर्ण दक्षिण सोलापूर मतदार संघातील जवळजवळ ८० ते ९० गावांचा गावभेट दौरा करण्यात आला आहे.  तेथील संपूर्ण धनगर समाज व इतर बहुजन समाज बांधवांशी देखील संवाद साधला गेला आहे. या गावभेट दौऱ्यास फारच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर समाज व इतर बहुजन समाज बांधवांचा दक्षिण सोलापूर मतदार संघात मध्यवर्ती ठिकाणी महामेळावा आयोजित करणार आहोत. सदर मेळाव्यात एक कमिटी स्थापन करून ठराव पास करून पुढील निर्णय जाहीर करुन शिष्टमंडळाद्वारे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना निवेदन देण्यात येणार आहे.

तरी धनगर समाजातील गरीबातील गरीब अशा निष्ठावंत कार्यकर्ता व उच्चशिक्षित ( डॉक्टर, वकील, इंजिनीअर) अशा तरुण सुशिक्षित उमेदवारास उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी धनगर समाजाच्यावतीने मागणी आहे. या सदर पत्रकार परिषदेस सिद्राम चोपडे, अप्पाराव हाके, रावसाहेब व्हनमाने, धर्मराज बल्लारी, राम शिनीवडीयार (पुजारी), प्रा. देवेंद्र मदने, कल्याणी कोकरे आदी उपस्थित होते.

=========================================================================================

  • सध्या महाराष्ट्र राज्यात ३५७ तालुके असून, त्यापैकी १५० तालुक्यात धनगर समाज हा बहुसंख्येने आहे. तरी त्या तालुक्यात धनगर समाजास विधानसभेसाठी काँग्रेस आय पक्षाकडून एकूण ७८ मतदार संघात उमेदवारी देण्यात यावे. सध्या २५१, दक्षिण सोलापूर मतदार संघात धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे १०,००० एवढी आहे.
  • सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, करमाळा, माढा, दक्षिण, उत्तर सोलापूर तालुक्यात धनगर समाज हा बहुसंख्येने असूनदेखील धनगर समाजास विधानसभेचे तिकीट-उमेदवारी देताना दरवेळी डावलले जाते. त्यामुळे धनगर समाजात असंतोष पसरला आहे.
  • धनगर समाजाचे नेते व माजी मंत्री कै. आनंदराव देवकते कोणत्याही प्रकारचा वैयक्तीक आणि स्वतःहाच  स्वार्थ न साधता   काँग्रेस पक्षासाठी फार मोठा त्याग केला आहे.  एका क्षणात त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन  पक्षासाठी फार मोठा त्याग केला आहे. देवकते  यांचे नेतृत्व सर्व समाजाला मान्य असे होते. त्यांना  लोक मानत होते. ते सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन जात असत.
  • तेव्हापासून आजतागायत जवळजवळ २० वर्षापासून दक्षिण सोलापूर मतदार संघास धनगर समाजास आमदारकीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. ही अतिशय खेदाची बाब आहे. तरी येत्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून धनगर समाजासच उमेदवारी देण्यात यावी, अशी  आग्रही मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *