२३ वर्षाखालील मुलांचे राज्य संघ निवड चाचणी क्रिकेट सामने: “ए” संघाला विजयासाठी हव्यात १५१ धावा; सी संघाकडे १५४ धावांची आघाडी
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूरच्या यश बोरामणीचे तडफदार शतक आणि अभिषेक निषदचे ९ बळी यांच्या भरीव कामगिरीच्या जोरावर एमसीए “ए” संघाने पहिल्या डावात १०९ धावांची आघाडी घेतली आहे.
पुरुषांच्या वरिष्ठ गटाच्या डी.बी.देवधर चषक पाठोपाठ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सौजन्याने येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियम आणि दयानंद कॉलेज मैदानावर राज्यातील २३ वर्षाखालील मुलांसाठीच्या संघ निवडीसाठी ३ दिवसीय क्रिकेट सामने पार पडत आहेत. पहिल्या फेरीच्या दुसऱ्या दिवशी सोलापूरच्या यश बोरामणीचे तडफदार शतक पहायला मिळाले. कालच्या नाबाद ८१ वरून संयमी खेळी करत यशने शतक झळकावले. त्याच्याच जोरावर एमसीए “ए” संघाने पहिल्या डावात १०९ धावांची आघाडी मिळवली. दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा अभिषेक निषदचे दुसऱ्या डावात ४ बळी आणि एकूण ९ बळी मुळे एमसीए ‘ए’ संघाचा दुसरा डाव २५९ धावांवर संपला. सलामीची जोडी सागर पवार आणि हर्ष मोगावीरा यांनी शतकी (११७ धावांची) भागीदारी रचली. उर्वरित फलंदाज तग न धरू शकल्याने तिसऱ्या दिवशी आता एमसीए “ए” संघाला विजयासाठी १५१ धावा करायच्या आहेत.

दुसरीकडे कालच्या २ बाद ८६ धावांवरून पुढे खेळताना एमसीए”सी” संघाने त्यांचा पहिला डाव ४१० धावांवर घोषित करत २१४ धावांची आघाडी मिळवली. सोहम शिंदे आणि अथर्व वानवे यांचे शतक पूर्ण झाले. अनुराग कवडेचे मात्र अर्धशतक होता होता राहिले. तळातील फलंदाज सारीश देसाईने मात्र चांगले फटके लगावत नाबाद ७० धावा केल्या. दुसऱ्या डावात एमसीए “डी” संघ ६० धावा करून देखील अद्यापही १५४ धावांनी पिछाडीवर आहे. तिसऱ्या दिवशी दोन्ही सामन्यांचे निकाल लागण्याची शक्यता आहे.
============================================================================================================
