पालकमंत्र्यांच्या हस्ते अतिरूद्र स्वाहाकाराचा भस्मधारण विधी
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे करण्यात आलेल्या अतिरुद्र स्वाहाकाराचा भस्मधारण विधी बुधवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते भाविकांना भस्म महाप्रसादाच्या वाटपाचा शुभारंभ झाला.
बुधवारी सकाळी विमानतळापाठीमागे असलेल्या कस्तुरबा नगरातील श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी प्रारंभी शिवलिंग रुद्राभिषेक, लघु रूद्रस्वाहाकर आदी विविध धार्मिक विधी करण्यात आले. याप्रसंगी मठाचे संस्थापक श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी, मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मठातर्फे मठाचे संस्थापक श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी, मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आशीर्वादरुपी सत्कार केला. मानाची शाल, नेपाळहून आणलेली रुद्राक्षांची माळ, पुष्पहार घालून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सन्मान झाला.
अतिरुद्र स्वाहाकाराच्या भस्म महाप्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात येत आहे. यात अतिरुद्र स्वाहाकाराचे भस्म आणि रुद्राक्ष भाविकांना मठातर्फे देण्यात येणार आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांनी याप्रसंगी केले.