जिल्हास्तरीय महिला बचत गटाच्या उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन, विक्री

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या  हस्ते उद्घाटन

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  : महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्योम विकास प्रकल्प अंतर्गत माविमचा ५० वा वर्धापन दिन व जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय महिला बचत गटाद्वारे उत्पादित वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन दि. ८ मार्च ते १० मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. याचे  उदघाटन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते कारण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक, (ग्रामीण) अतुल कुलकर्णी  त्यांच्या धर्मपत्नी महिमा कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक (भरोसा सेल, ग्रामीण पोलीस) सुरेखा शिंदे,  जिल्हा विकास व्यवस्थापक, नाबार्ड सोलापूरचे  नितीन शेळके,  सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सोलापूरचे संगिता खंदारे, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार माविम, पुणे विभागचे सिद्धाराम माशाळे,  उद्योगवर्धिनी, सोलापूरच्या चंद्रिका चव्हाण आदी उपस्थित होते.

 यावेळी कुलदीप जंगम म्हणाले,  बचत गटाच्या उत्पादनासाठी जिल्हास्तरावर एक स्वतंत्र दालन निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगितले.  त्या ठिकाणावरून सर्व उत्पादनाची विक्री व मार्केटिंग होईल आणि लवकरच याची सुरवात होईल असेही म्हणाले. महिमा कुलकर्णी यांनी  महिलांबरोबर संवाद साधला. महिला या पुरुषांपेक्षा कमी नाहीत. त्यादेखील कोणत्याही कामात पुढाकाराने पुढे आल्यास त्या कामात त्या उच्च शिखरावर पोहोचतील, अशी आशा व्यक्त केली.

अतुल कुलकर्णी म्हणाले, पोलीस प्रशासन सदैव महिलांसोबत आहे. महिलांना कोणत्याही अडचणी असल्यास त्यांनी पोलिसांची निसंकोच संपर्क साधावा, असे आवाहन केले. सर्वांनी विषमुक्त शेती करून आपले आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुधारावे, असेही त्यांनी सांगितले.  सिद्धाराम माशाळे यांनी माविमतर्फे चालवण्यात येणारे उपक्रम व नवतेजस्विनी प्रकल्पअंतर्गत उप-प्रकल्प अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले .

प्रास्ताविक करताना जिल्हा समन्वयक अधिकारी सोमनाथ लांमगुंडे यांनी माविमची सोलापूर तालुक्यातील वाटचाल व प्रगतीबाबत मनोगत व्यक्त केले. यावेळी मोहोळ तालुक्यातील बचत गट सदस्य, पदाधिकारी, सीएमआरसी स्टाफ, मोहोळ, माळशिरस तालुक्यातील कर्मचारी उपस्थित होते.  सूत्रसंचालन प्रशांत गायकवाड, आभार प्रदर्शन सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश भारत यांनी केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *