जुळे सोलापूरमध्ये ऑटो डॉग फीडरच्या पहिल्या प्रयोगाला सुरुवात
by assal solapuri ||
सोलापूर : मुक्या प्राण्यांची सेवा करणे आणि चार पायांच्या आपल्या मित्रांसाठी सोलापुरातील काही तरुण एकत्र आले. त्या त रुणांनी एकत्रित येऊन मोकाट आणि भटकंती श्वानांसाठी आता ऑटो डॉग फीडर अर्थात त्यांना अन्न-खाद्य पुरविणारी “फूड बँक”ची सेवा सुरु केली आहे. यशवंत राऊत, सोहम पावले, राहुल बिराजदार, चेतन पाटील, प्रवीण राऊत या तरुणांनी सोलापुरात हा एक आगळा-वेगळा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला. त्याचा शुभारंभदेखील रविवारी करीत आहेत.
शहरातील रस्त्यावरील भटकंती श्वानांच्या समस्येवर उपाययोजना म्हणून ऑटो डॉग फीडरचे उद्घाटन रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ वाजता पतंजली शो-रूमजवळ, डीमार्ट रोड, जुळे सोलापूर येथे होणार आहे. या कार्यक्रमात रस्त्यावरील श्वानांसाठी अन्न उपलब्ध करून देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, याबद्दल प्रबोधन करण्यात येईल, अशी माहिती यशवंत राऊत, सोहम पावले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकोट संस्थानचे राजे श्रीमंत मालोजीराजे भोसले, पोलीस आयुक्त एम. राजकुमार हे उपस्थित राहणार आहेत. या विशेष उपक्रमात सहभागी होऊन-रस्त्यावरील श्वानांची काळजी घेण्याची संधी सर्वांना मिळेल.
सध्या सोलापूरमध्ये भटकंती श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, ज्यामुळे भटकंती श्वानांना अन्न मिळवण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून सोलापूरच्या तरुणांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून रस्त्यावरील भटकंती श्वानांसाठी ‘ऑटो डॉग फीडर’ ही यंत्रणा बसवली जाणार आहे, ज्यामुळे श्वानांना पौष्टिक अन्न मिळेल आणि अन्नासाठी होणारे भांडण कमी होतील.
या अभियानात सहभागी होण्यासाठी आणि मदतीचा हात पुढे करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. मोकळी जागा उपलब्ध करून दिल्यास तिथे हे फीडर बसवता येतील. शिवाय, नागरिकांना या अभियानात सहभाग घेण्यासाठी पॅकबंद खाऊ देण्याचे आवाहन केले आहे. त्यातून आलेल्या अन्न खाऊ घातले जाईल, आणि त्याबद्दलची माहिती व्हिडिओद्वारे दिली जाईल. या पत्रकार परिषदेला राहुल बिराजदार, यशवंत राऊत, सोहम पावले, चेतन पाटील, प्रवीण राऊत उपस्थित होते.

=============================================================

या ऑटो डॉग फीडरसाठी चार इंची जाडीचे पाईप वापरण्यात आले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी सहजतेने या श्वानांना खाता येईल असे पौष्टिक खाद्यान्न ठेवले जाणार आहे. या पाईपमध्ये जवळपास पाच किलो इतके खाद्य बसेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास चार ते पाच दिवस पुरेल इतका अन्नसाठा यामध्ये असणार आहे. पौष्टिक, ताजे आणि टिकेल अशा पद्धतीने साठवण करून याचा पुरवठा केला जाणार आहे. शहरातील जुळे सोलापूर, अक्कलकोट रोड, बाळे अशा विविध भागांमध्ये सदरचे ऑटो डॉग फीडर लावण्यात येणार आहे. आसपासच्या रहिवाशी आणि त्यांच्या परवानगी आणि सहकार्याने हा अनोखा प्रयोग सोलापुरात करण्यात येणार आहे, असे यशवंत राऊत, सोहम पावले यांनी सांगितले. यासाठी लागणारे खाद्यान्नची पिशवी पाच किलोमध्ये उपलब्ध असून, हे पौष्टिक असे खाद्यान्न १२० रुपये किलोप्रमाणे बाजारात उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
============================================================================================
सोलापूरमधील या उपक्रमामुळे रस्त्यावरील भटकंती श्वानांसाठी आवश्यक अन्नाची सोय होणार आहे, कोणता ही प्राणी कधीच स्वतःहून नुकसान व त्रास देत नाही आणि श्वान हा मानवाचा सगळ्यात जवळचा मित्र मानला जातो. त्यामुळे ही जागरुकता निर्माण करून सामाजिक परिवर्तन घडवण्यास मदत होईल. आपल्या घरातील पाळीव श्वान मित्रांना सोबत आणून, सोलापूरला चार पायांच्या मित्रांसाठी एक सुरक्षित स्थान बनवण्यासाठी सहाय्य करा. या अन्न बँकेविषयी अधिक माहितीसाठी यशवंत राऊत (९९२३५७३२९) सोहम पावले (९९२३३०६६२५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

