बीएनएस,बीएनएसएस, बीएसएवरील पॉकेट बुक उपयुक्त ठरेल
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : जिल्हा सरकारी वकील प्रा. ॲड. प्रदीपसिंह राजपूत यांनी लिहिलेल्या राजपूत पॉकेट बुक या (BNS, BNSS आणि BSA ) बीएनएस,बीएनएसएस, बीएसएवरील पुस्तकाचे प्रकाशन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित आळंगे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲड. मिलिंद थोबडे आदींच्या हस्ते सोमवार, दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी सोलापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित आळंगे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले, राजपूत यांनी लिहिलेले पुस्तक वकिलांनाच नाही तर पोलिसांनादेखील अतिशय उपयुक्त असल्याचे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमात बारचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. श्रीनिवास क्यातम, ॲड. एस. एस. सदाफुले, ॲड. गंगाधर रामपुरे यांनी प्रत्येक वकिलास हे पॉकेट बुक त्यांच्या दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त असे सांगितले. पुस्तकाचे लेखक ॲड. प्रदीप सिंह राजपूत यांनी त्यांच्या या पुस्तकाची संकल्पना आणि हे पुस्तक लिहिण्याचा संपूर्ण प्रवास वर्णन केला. तसेच त्यांनी १०० जन्मठेप आणि दोन फाशी शिक्षा मिळवल्याबद्दल शंभर उपक्रम राबवण्याचा संकल्प करून त्या उपक्रमापैकी हा एक उपक्रम असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमावेळी सोलापूर बार असो.चे अध्यक्ष ॲड. अमित आळंगे, उपाध्यक्ष ॲड. व्ही. पी. शिंदे, सचिव ॲड. मनोज नागेश पामूल, सहसचिव ॲड. निदा सैफन, खजिनदार ॲड. विनयकुमार कटारे यांच्यासह सोलापूर बार असोसिएशन बहुसंख्य विधिज्ञ उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव ॲड मनोज पामुल, आभार प्रदर्शन उपाध्यक्ष ॲड. निदा सैफन यांनी केले.