सोलापूर : प्रतिनिधी
येथील डोणगाव रस्त्यावरील 65 एकर जागेत आर्यन्स ग्रुपच्या माध्यमातून आठशे कोटींची गुंतवणूक करून सोलापूरातील पहिले आयटी पार्क साकारण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन येत्या 13 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी महापौर महेश कोठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आर्यन्स ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
या भूमीपूजन समारंभास राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरच प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, पंचशील ग्रुपचे अतुल चोरडिया, सतीश मगर, आर्यन ग्रुपचे चेअरमन मुकुंद जगताप, आर्यन ग्रुपचे एमडी सिम्ता जगताप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या IT पार्कमध्ये आयटीसी संलग्न अशा विविध कंपन्या येणार आहेत. मार्च अखेर या आयटी पार्कचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल. त्यानंतर दहा ते पंधरा हजार तरुणांना रोजगार मिळणार असल्याचे महेश कोठे यांनी सांगितले.
या IT पार्कमुळे शहरात आयटी क्षेत्रातील उद्योगांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. या आयटी पार्कच्या माध्यमातून मोठ्या आयटी कंपन्या, आयटी क्षेत्रातील स्टार्टअप्स, उद्योजक आणि त्यांच्याशी संबंधित उद्योगांना आकर्षित केले जाणार आहे. या माध्यमातून सोलापूरमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांसाठी एक पोषक वातावरण तयार होणार असल्याचे कोठे यांनी यावेळी सांगितले.
IT पार्कचे भूमिपूजन झाल्यानंतर महिन्यात सोलापूरच्या आयटी तरुणांना येथे नोकरी मिळेल. पहिल्या टप्प्यात टेक्निकलच्या दीड हजार तर नॉन टेक्निकलच्या 3 हजार तरुणांना काम मिळेल. 3 वर्षांमध्ये जवळपास 10 ते 15 हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यानिमित्ताने मी गेल्या 6 वर्षांचे स्वप्न पूर्ण करत आहे. आता इतर राजकीय पक्षांच्या लोकांनी करून दाखवावे आणि शहराच्या विकासात भर घालावी, असे आवाहन माजी महापौर महेश कोठे यांनी यावेळी केले.
आर्यन्स ग्रुप क्षेत्रात काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर देखील काम करत आहे. कंपनी पूर्णतः भारतीय बनावटीचे सर्च इंजिन बनवणार आहे. कंपनीसाठी हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. कारण गुगल किंवा इतर सर्च इंजिन देशाबाहेरील आहेत. ज्यामुळे भारताच्या दृष्टीने हा एक सुरक्षेचा विषय आहे. याबरोबरच कंपनी भारतीय बनावटीचे वेय ब्राउजर देखील बनवत आहे. जे पूर्णपणे सुरक्षित असेल. आयटी पार्कसह इतर प्रकल्पांसाठी जागा मिळाल्यास 800 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक होणार आहे.
या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी नगरसेवक प्रथमेश महेश कोठे, प्रमोद गायकवाड, संजय शेंडगे, महेश चिलवेरी, शेखर शहाणे यांची उपस्थिती होती.
आर्थिक विकासाला चालना
-आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनी शहरामध्ये आयटी पार्क उभारत आहे. ही आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रेरणेमुळे आम्हाला हे साध्य करणे शक्य झाले आहे. या अत्याधुनिक आयटी पार्कच्या माध्यमातून या भागात आर्थिक विकासाला चालना तर मिळणार आहेच. त्याबरोबरच रोजगाराच्या अनेक संधी देखील निर्माण होणार आहे. आयटीआय क्षेत्रातील टर्नर फिटर सह अनेक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय व्यापार वृद्धींगत होण्यासाठी या IT पार्कमुळे मदत होणार आहे. सोलापूरच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
-महेश कोठे, माजी महापौर
IT पार्कची वैशिष्ट्ये
-IT पार्कची इमारत सिंगापूरच्या धर्तीवर उभी करणार आहे. या ठिकाणी तयार होणारे रोबोट, ज्वेलरी, किचन आदींचे काम मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये चालेल. अशी माहिती आर्यन ग्रुपचे संचालक संजय शेंडगे यांनी दिली.