सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
By assal solapuri||
सोलापूर : महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची” मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे पुण्यकर्म म्हणून आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. सदर बाब विचारात घेवून सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना दि.१४ जुलै २०२४ च्या शासन निर्णायानुसार राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेतून प्रति व्यक्ती ३० हजार रुपये खर्चाची कमाल मर्यादा असून यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास आदी बाबीचा समावेश असेल. भारतातील ७३ व राज्यातील ६६ निर्धारित स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता योजनेतून एकवेळ लाभ घेता येईल. सदर योजनेतून पात्र प्रवाशांची निवड ही पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे करण्यात येईल.