उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : राज्य शासन दुष्काळग्रस्त भागाला पाणीदार करून सिंचन वाढवण्यासाठी कटिबद्ध; सांगोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||
सोलापूर : राज्य शासन दुष्काळग्रस्त भाग पाणीदार करण्यासाठी विविध जलसंधारणाची कामे राबवत आहे. दुष्काळग्रस्त भागाला पाणी उपलब्ध करणे व सिंचन क्षमता वाढवणे यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सांगोला येथे आयोजित भीमसैनिकांनी उभारलेल्या निधीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तसेच माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आमदार निधीतून साकारण्यात आलेल्या भव्य स्मारकाच्या अनावरणप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आ. बाबासाहेब देशमुख, आ. समाधान आवताडे, आ. राजू खरे, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना व सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी ३ हजार कोटीच्या निधीला मान्यता दिलेली आहे. ताकारी व म्हैसाळ या दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजना आहेत. सांगोला तालुक्यालादेखील सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. शासन दुष्काळग्रस्त भागाला पाणीदार करून त्या भागातील सिंचन क्षमता वाढवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या शासनाचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारावर चालत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत आहे. जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाऊलखुणा आहेत, तो भाग शासनाच्या वतीने विकसित करण्यात येत असून, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
सांगोला तालुक्याचे विकासासाठी भरघोस निधी देण्यात आलेला असून, पुढील काळातही सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिल्या जाणार नसल्याचे त्यांनी सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी ५० लाखाचा निधी देत असल्याची घोषणा त्यांनी केली. सांगोला येथील एमआयडीसी जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
- यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, डॉ. बाबासाहेबांच्या या स्मारकातून आपण बाबासाहेबांचे विचार समता, स्वातंत्र्य व बंधुता हे सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. शासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून सांगोला तालुक्याचा ही विकास करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई या मान्यवरांच्या हस्ते सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.