रेल्वेच्या स्वप्नील कुसाळेला कांस्यपदक
पॅरिस ऑलिम्पिक : ५० मीटर रायफल शुटींगमध्ये कामगिरी
By assal solapuri ।।
सोलापूर : रेल्वेच्या स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिक -२०२४ मध्ये ५० मीटर रायफल शुटींग (नेमबाजी) स्पर्धेत तृतीय क्रमांकासह कांस्यपदक मिळवून रेल्वेसह भारताचे नाव उंचावले. ही उल्लेखनीय कामगिरी भारताचे ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये पहिले ऑलिम्पिक पदक आणि पॅरिस ऑलिम्पिक खेळांमधील नेमबाजीतील देशाचे तिसरे पदक आहे.
========================================================================================================

अंतिम फेरीत एकूण ४५१.४ गुण मिळवत स्वप्नीलचा क्रिडा पदकासाठीचा प्रवास चमकदार कामगिरीचा होता. सहाव्या स्थानापासून सुरुवात करून, त्याने क्रमवारीत कांस्यपदक मिळवण्यासाठी अपवादात्मक कौशल्य आणि संयम दाखवला. ५० मीटर रायफल ३ पोझिशन मध्ये गुडघे टेकून, प्रोन आणि स्टँडिंग सीरिजमध्ये प्रत्येकी २० शॉट्स शूट केले.
===================================================================================================
या यशामुळे भारताच्या पदक तालिकेतच भर पडली असे नव्हे तर भारतीय नेमबाजी खेळातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून स्वप्नीलची ओळख बनली. त्याचे यश अनेक वर्षांच्या समर्पण आणि प्रशिक्षणानंतर आले आहे, ज्यामुळे तो देशातील महत्वाकांक्षी खेळाडूंसाठी एक आदर्श बनला आहे. भारतीय रेल्वेने नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. खेळांडूना सरावासाठी कामाच्या व्यापातून मजबूत आणि अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वप्नील कुसाळेच्या या यशाबद्दल भारतीय रेल्वेसाठी अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब असून, त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. त्याच्या समर्पण आणि मेहनतीमुळे भारतीय रेल्वे आणि देशाला मोठा सन्मान मिळाला आहे.
=======================================================================================================
- स्वप्नील कुसाळे, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असून भारतीय रेल्वेमध्ये २०१५ साली मध्य रेल्वेच्या पुणे विभागात वाणिज्यिक तिकीट लिपिक म्हणून रुजू झाले आहेत. त्यांनी २०२३ मध्ये चीन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा, २०२२ मध्ये बाकू येथील विश्वचषक स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले आहे. २०२१ मध्ये नवी दिल्ली तसेच त्याने २०१५ ते २०२३ या कालावधीत विविध नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये रौप्य आणि कांस्य पदके जिंकली आहेत.
