सोलापूर : प्रतिनिधी
रेल्वे सुरक्षा दल (RPF) हे रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी नेहमीच आघाडीवर असतात. चोवीस तास जागरुक राहतात. तसेच कर्तव्यावर असलेल्या इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवतात. यंदाही वर्षभरात रेल्वे सुरक्षा दलाने 86 व्यक्तींचे प्राण वाचविले आहेत.
“मिशन जीवन रक्षक” चा एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी 2022-23 मध्ये मध्य रेल्वेत स्वतःचा जीव धोक्यात घालून आतापर्यंत 86 लोकांचे जीव वाचवले आहेत. या घटनांचे व्हिज्युअल्स प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप लोकप्रिय तर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या 86 घटनांपैकी एकट्या मुंबई विभागात 33 व्यक्तींचा जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. नागपूर विभागात 17, पुणे विभागात 13, भुसावळ विभागात 17 आणि सोलापूर विभागात 6 व्यक्तींचा जीव वाचवण्याचत आला आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीतील अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका, ट्रेन आणि रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवूण देणे आदी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना केला आहे. ते प्रवाशांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवतात.
आरपीएफच्या सतर्कतेने बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, जे काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा सामना करतात. काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करताना जीव वाचवण्यात आला आहे. पण शेवटी, जीव वाचवणाऱ्यांच्या या कृतीचा परिणाम आनंददायक, सुखकारक आणि आरपीएफ जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा असतो.
प्रवाशांनी ट्रेन सुटण्याच्या वेळेआधीच स्टेशनवर पोहोचावे. धावत्या ट्रेनमधून चढून किंवा उतरून आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना करण्यात आले आहे.