– स्मारक समितीच्या बैठकीत निर्णय
सोलापूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय भवनासमोर साकारण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्याचा निर्णय स्मारक समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
विद्यापीठात कुलगुरू तथा स्मारक समितीच्या कार्याध्यक्षा डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समितीची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे सदस्य बापू हटकर, शिवाजी बंडगर, डॉ. बाबासाहेब देशमुख, मोहन हळणवार, शिवदास बिडगर, शिवाजी कांबळे, सुभाष मस्के, नागेश वाघमोडे, अमोल कारंडे, शरणू हांडे, बापू मेटकरी, सोमेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
प्रारंभी कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ब्रांझमधील भव्य 15 फुटी पूर्णाकृती पुतळा पदमश्री पुरस्कार विजेते शिल्पकार राम सुतार यांच्याकडून तयार करून घेतल्याचे सांगितले. हा पुतळा विद्यापीठात दाखल झाल्याचेही त्यांनी यावेळी सदस्यांना सांगितले. यावेळी पुतळा अनावरण कार्यक्रमासंदर्भात चर्चा झाली. सर्व सदस्यांनी एकमतानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्घाटनासाठी बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्याचे यावेळी ठरवण्यात आले आहे. डॉ. अंजना लावंड यावेळी उपस्थित होत्या. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी सर्वांचे आभार मानले.