मक्तेदारांनी मुदतीत काम न केल्यास होणार दंडात्मक कारवाई
- क्षमतेपेक्षा अधिक कामे घेऊन ठेवणाऱ्या मक्तेदारांना नवी कामे नाहीत
सोलापूर : प्रतिनिधी
महापालिका अंतर्गत विविध विकास कामे करणाऱ्या मक्तेदारांना यापुढे मुदतीत काम करणे बंधनकारक राहणार आहे. मुदतीत काम न करणाऱ्या मक्तेदारांना आता दंड आकारून मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिली.
महापालिकेच्यावतीने विविध विकासकामांचा मक्ता मक्तेदारांना दिला जातो मात्र ही कामे मुदतीत केली जात नाहीत. त्यासाठी आता सर्व मक्तेदारांना मुदतीत काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत काम न केल्यास संबंधित मक्तेदारांवर दंड आकारण्यात येईल आणि त्यानंतरच मुदतवाढ देण्यात येईल, असे महापालिका आयुक्तांनी सांगितले.
दरम्यान, काही मक्तेदार हे त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक कामे घेऊन ठेवतात. अशा मक्तेदारांना आता यापुढे नवी कामे मिळणार नाहीत. कराराप्रमाणे मुदतीत विकासकामे पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अटी व शर्तीमध्ये बदल करण्यात येत आहे. यामुळे क्षमतेपेक्षा अधिक कामे घेऊन ठेवणाऱ्या मक्तेदारांना नवी कामे मिळणार नाहीत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.