साडेतीन तास कृषीमंत्री रमले स्टॉल्स पाहण्यात, ३३५ स्टॉल्सला दिल्या भेटी;
शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, मार्गदर्शक बाबी उपलब्ध, शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा : धनंजय मुंडे
by assal solapuri||
परळी वैजनाथ : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात प्रथमच परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवातर्गत भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी उद्घाटन समारंभ संपल्यानंतर तब्बल साडेतीन तास ३३५ विविढ प्रकारच्या कृषी स्टॉल्सला भेट देऊन पाहणी केली.
कृषी क्षेत्रात लागलेले नवनवीन शोध, नवनवीन तंत्रज्ञान, नवीन आधुनिक अवजारे यांसह विविध शेती उत्पादने आदींची शेकडो दालने (स्टॉल्स) उभारण्यात आली आहे. नॅनो खतांची ड्रोनद्वारे फवारणी करण्याची प्रात्यक्षिके सुद्धा येथे दाखवण्यात येत आहेत. या स्टॉल्सला भेटी देण्यामध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे हे तब्बल साडेतीन तास रमले होते. जवळपास ७.३० ते ११ वाजेपर्यंत या वेळेत त्यांनी जवळपास ३३५ स्टॉल्सला भेटी देऊन पाहणी केली. त्यांच्याकडील उत्पादन, तंत्रज्ञानाची माहिती घेतली. चारही कृषी विद्यापीठाचे स्टॉल्स या ठिकाणी उभारले असून, तेथील उपक्रमांचीही मुंडेंनी माहिती घेतली.

या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या स्टॉल्समध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करण्यासाठी आणि शेतीमध्ये अधिक समृद्धी आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक बाबी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत/ राज्यभरातील शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, लाभ मिळवावा, असे आवाहन याप्रसंगी धनंजय मुंडे यांनी केले आहे. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक मुळे, आत्माचे जिल्हा प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांसह अधिकाऱ्यांनी मुंडे यांना माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. त्यालाही शेतकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला. स्टॉल पाहत असतानाच धनंजय मुंडे यांनी स्टॉलवर असलेले विविध मिलेटपासून तयार केलेले खाद्यपदार्थ, फळे यांचा शेतकऱ्यांच्यासोबत आस्वाद घेतला.


