विशेष लेख : वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेला समर्पित असणारा उपक्रम ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’

विशेष लेख : वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेला समर्पित असणारा उपक्रम ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’

पंढरपूरची वारी म्हटली म्हणजे महाराष्ट्राचे आस्था केंद्र. संपूर्ण राज्यातील वारकरी विठुरायाच्या भक्ती रसात तल्लीन होवून पंढरपूर गाठू लागतात. ही वारी केवळ पायी चालत दर्शन घडविणारी नाही, तर आपल्या नि:स्वार्थ, जीवाची पर्वा न करता दर्शनाची ओढ असणाऱ्या भावनांचे दर्शन घडविणारी विचारधारा आहे. या वारीमध्ये राज्यातून नाही, तर बाहेरील राज्यांतूनही वारकरी दर्शनाच्या ओढीने येतात. वारीची ख्याती देशभर पसरली असून जागतिक स्तरावरही दखलयोग्य ठरली आहे. बऱ्याच वेळा विदेशी नागरीकही वारीमध्ये सहभागी होतात. वारीमध्ये आलेल्या वारकऱ्याच्या आरोग्याची काळजी घेवून आवश्यकता असल्यास उपचार करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाने उचलली. वारकऱ्यांच्या आरोग्य सेवला समर्पित असणारा आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी उपक्रम सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून मुर्त रूपात आला आहे. वारकऱ्यांची मने जिंकणारा हा उपक्रम ठरला आहे.

image source
आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे आलेल्या विविध पालखी, दिंड्यांमधील लाखो वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य सेवा देण्यात आली. अगदी त्यांचे पायही आरोग्य कर्मचाऱ्यांनी तेलाने चोळून वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमातून यावर्षी दि. २१ जुलैपर्यंत तब्बल १५ लाख १२ हजार ७७४ वारकऱ्यांची विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात येवून गरजूंवर उपचार करण्यात आले आहे.
श्री संत गजानन महाराज (शेगांव जि. बुलढाणा), श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीर पालखी (कौंडण्यपूर जि. अमरावती), श्री. संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर जि. जळगांव) यासह श्री. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी (त्र्यंबकेश्वर जि. नाशिक), श्री. संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी जि. पुणे), श्री. संत तुकाराम महाराज (देहू जि. पुणे), श्री. संत एकनाथ महाराज (पैठण जि. छ. संभाजीनगर) आदी जवळपास छोट्या – मोठ्या अनेक दिंड्यांमधून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला आले. मात्र या सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी या उपक्रमातून आरोग्य विभागाने घेतली आहे. शासकीय यंत्रणा एवढ्या मोठ्या उपक्रमाद्वारे वारीसारख्या भव्यदिव्य आयोजनात वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेवू शकते, हे अनेकांना नवल वाटावे, असेच होते.
वारकऱ्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला, तर तातडीने उपचारासाठी आरोग्य विभागाने सलग दुसऱ्या वर्षी ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला. प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक याप्रमाणे २५८ तात्पुरत्या ‘आपला दवाखाना’ ची सुविधा निर्माण करण्यात आली. वारी दरम्यान ६ हजार ३६८ आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविल्या. पालखी आणि दिंडी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी ५ खाटांचे तात्पुरता अति दक्षता विभाग (आयसीयू) सज्ज ठेवण्यात आला होता. येथे ऑक्सिजन, मॉनिटर, औषधी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.
पालखी मार्गावर १०२ व १०८ रुग्णवाहिका सेवा असलेल्या ७०७ रूग्णवाहिकांनी अविरत सेवा दिली. रूग्णवाहिकेमार्फत १५६१ वारकऱ्यांना अति तातडीची सेवा देण्यात आली. पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना ५८८५ आरोग्य कीट देण्यात आले होते. याबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोयही करण्यात आली होती. महिला वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी एकूण १३६ स्त्री रोगतज्ञ कार्यरत होते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी १३६ हिरकणी कक्षांची स्थापना करण्यात आली होती. पालखी बरोबर एकूण ४ आरोग्य पथके सुसज्ज रूग्ण्वाहिकेसह अविरत पालखी परतेपर्यंत सोबत आहेत.

पालखी मार्गावर ताप, सर्दी, खोकला, ड्रेसींग, जुलाब चा त्रास झाल्यास सेवेसाठी अॅम्बुलन्स बाईक तैनात ठेवण्यात आली होती. कारण आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर गर्दी जास्त असल्याने प्रत्येक ठिकाणी मोठी अॅम्बुलन्स फिरू शकत नाही. त्यासाठी २१२ आरोग्यदूत बाईक ॲम्बुलन्सच्या माध्यमातून आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती.
पालखी मार्गावरील आरोग्याच्या सुविधांव्यतिरिक्त आरोग्य विभागाने पंढरपूर शहरात वाखरी, 3 रस्ता, गोपाळपूर या तीन विविध ठिकाणी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन दि. १४ ते १८ जुलै दरम्यान करण्यात आले होते. पंढरपूरमधील ६५ एकर व गोपाळपूर येथे रूग्णालयाची व्यवस्थाही उभारण्यात आली होती. शहरात विविध ठिकाणी ६ अतिदक्षता विभाग, १४ तात्पुरता आपला दवाखाना तर ग्रामीण भागात २६ ठिकाणी अतिदक्षता विभाग कार्यान्वीत करण्यात आले. ही सुविधा गोपाळकालापर्यंत असणार आहे. तसेच एकूण १२१ आरोग्य दुतामार्फत आरोग्य सेवा देण्यात आली

. महाआरोग्य शिबिरांत विशेषज्ञ १५३, वैद्यकीय अधिकारी ४९०, पॅरामेडीकल कर्मचारी ५४१, नर्सेस ४२६, आशा कार्यकर्ता ४६६, अन्य कर्मचारी ६३६ व स्वयंसेवक १००० अशाप्रकारे एकूण ३७१२ मनुष्यबळांकरवी आरोग्य सेवा देण्यात आली आहे. ‘न भुतो’.. असा हा उपक्रम निश्चितच वारकऱ्यांची खऱ्या अर्थाने आरोग्य सेवा देणारा ठरला आहे.

-निलेश तायडे,
विभागीय संपर्क अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *