सोलापूर : प्रतिनिधी
शासकीय यंत्रणेत टक्केवारी हा प्रकार नविन नाही. मात्र सोलापूर महापालिकेत नगर अभियंता कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याची तऱ्हा त्याहून निराळी आहे. ठेकेदाराने टक्केवारीतील पाचशे रूपये कमी दिल्याने येथील अधिकारी नाराज होत आहे. तर उर्वरीत पाचशे रूपये मिळाल्याशिवाय सदरच्या फाईलवर अजिबात सही केली जात नाही.
यापूर्वी महापालिकेतील विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना टक्केवारीसाठी नगरसेवकांनी भर सर्वसाधारण सभेत फैलावर घेतल्याचे प्रकार सर्वश्रृत आहेत. टँकर घोटाळ्यातील काही अधिकारी निलंबीत आणि पुढे जाऊन बडतर्फ झाले आहेत. अनेकांचे निलंबन झाले आहे. तर अनेकजणांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. मात्र विविध कामांची बिले मंजुर करण्यासाठी ठेकेदारांकडून वसुली सुरूच आहे. असाच प्रकार सध्या नगर अभियंता कार्यालयात परंपरेनुसार सुरू आहे. संबंधीत ठेकेदारांना रस्ते दुरूस्ती, नविन रस्ते करणे, बगीचा दुरूस्तीच्या आदी कामांसाठी टक्केवारी दिल्याशिवाय बिले मंजुर केली जात नाहीत. बिलाच्या एकूण रकमेवर टक्केवारी घेतली जात असून टक्केवारीतील पाचशे रूपयेही कमी घेतले जात नाहीत. अन्यथा पाचशे रूपये कमी देणाऱ्या ठेकेदाराच्या बिलांवर सही केली जात नाही. या अजब प्रकारामुळे ठेकेदारही चक्रावले आहेत.