सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पैशाचीच चर्चा
by assal solapuri ||
हनुमंत चौधरी/चिखली : मोहोळ तालुका व चिखली परिसरात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पैशाची चर्चा सुरु असून, बॅंकामध्ये महिलांची गर्दी लोटली आहे. रक्षाबंधनाच्या अगोदर काही महिलांना या योजनेतील पैसे आल्याने उर्वरित महिलांना त्या पैशाची प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये महिलांची गर्दी होत आहे.

योजनेत आपले नाव आहे की नाही, पैसे जमा झाले की नाही, कागदपत्रांची पूर्तता झाली की नाही, हे पाहण्यासाठी बँकांमध्ये प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. या गर्दीतून दिवसभर बँक अधिकाऱ्यांना तोंड काढता येईना झाले आहे.
बँकांना ई-केवायसी करणे यासह खात्यांना आधार लिंक करण्यावर महिलांनी जोर दिला. खाते तपासण्यासाठी बँकांमध्ये गर्दी, यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बँकांत असलेली गर्दी अजूनही जैसे थे आहे. रक्षाबंधनला ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत. त्यांची खाते तपासणी करण्यासाठी पुन्हा बँकेत गर्दी होताना दिसत आहे. ज्या महिलांना अद्याप पैसे आलेले नाहीत. त्या महिलाही बँकेत हेलपाटे मारत आहेत. एकंदरीत या योजनेमुळे बँकेत होणाऱ्या गर्दीमुळे अधिकारी हैराण झाले आहेत. ते गर्दीतून तोंड वर काढून उत्तरे देऊन त्रस्त झाले आहेत.