मोहोळ पोलिसांची यशस्वी कामगिरी
by assal solapuri ||
मोहोळ : मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन घरफोडया, एक जबरी चोरी आणि एक फसवणूक अशा विविध गुन्ह्यातील तीन वेगवेगळ्या संशयीत आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात मोहोळ पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून जवळपास २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अक्षय ऊर्फ थावर मैदान भोसले, आकाश ऊर्फ पपण्या संभाजी चव्हाण, प्रतीक नामदेव शिंदे अशा तिघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वडवळ, शिरापूर, हिवरे, मोहोळ शहर व मलिकपेठ या ठिकाणी घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी गुन्हे शाखेला चोऱ्यांच्या तपासासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मोहोळ पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने, गजानन कर्णेवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे, सचिन माने, राहुल कोरे, रणजीत भोसले, पो.ना. चंद्रकांत ढवळे, पो.कॉ. सिद्धनाथ मोरे, अजीत मिसाळ, अमोल जगताप, सुनील पवार, स्वप्निल कुबेर, संदीप सावंत व सायबर सेलचे पोलीस हेड.कॉ. युसुफ पठाण यांची टीमने सदरच्या गुन्ह्याचा अभ्यास केला. रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, नाकाबंदी करणे, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बार्शी, कामती, मंगळवेढा, मोहोळ, अकलूज, सोलापूर शहर, महाराष्ट्र, परराज्यातील गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करीत असताना सदरच्या गुन्ह्याचा उलगडा झाला.
=========================================================================================
- दि. ६ जुलै २०२४ रोजी मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरापूर येथे अनिल पाटील यांच्या राहत्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून सोन्याचे कानातील झुबे व मनी मंगळसूत्र नेल्याची घटना घडली होती. त्यापैकी अक्षय ऊर्फ थावर मैदान भोसले (रा. कासारी, ता. आष्टी, जिल्हा बीड) याला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला. दरम्यान त्यामध्ये त्याने शिरापूर, मलिकपेठ, वडवळ येथील घरफोडी केल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडून १ लाख ८० रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले.
- दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल १९ गुन्ह्यातील फरारी संशयीत आरोपी आकाश ऊर्फ पपण्या संभाजी चव्हाण (रा. बेंबळी ता. धाराशिव) याला धाराशिव येथून शिताफीने पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मोहोळ तालुक्यातील हिवरे पाटी येथील एका वृद्ध महिलेस मारहाण करून त्यांच्या गळ्यातील व कानातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरीने घेऊन गेल्याची कबुली दिली.
- तिसरा संशयित आरोपी प्रतीक नामदेव शिंदे( रा. पानगाव, ता.माण, जि. सातारा) याने दि. ३ जुलै २०२४ रोजी मोहोळ शहरातील बसस्थानकाशेजारील पंढरपूर रोडजवळ थांबलेल्या महिलेजवळ जाऊन सोनेरी रंगाचा बिस्किटासारखा धातू पायात टाकून हा तुमचाच आहे का? आपल्या दोघांना दिसला आहे, तर आपण दोघेजण वाटून घेऊ असे म्हणत तिच्याकडून गळ्यातील व कानातील तीस हजार रुपये किंमतीचे दागिने घेऊन तिला बनावट सोन्याचे बिस्किट दिल्याची घटना घडली होती. प्रतीक शिंदे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ही पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले आहे. वरील प्रमाणे मोहोळ पोलीस ठाण्याकडील गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी, जबरी चोरी व फसवणूक अशा पाच गुन्ह्यातील वेगवेगळ्या तीन आरोपींकडून २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.