मोडनिंब : “डाळिंब एक खोड तंत्रज्ञान” कार्यशाळेत १५०० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला
बैरागवाडीतील प्रवीण माने यांनी केले “डाळिंब एक खोड तंत्रज्ञान” विकसित
By assal solapuri ।।
सोलापूर : मोडनिंब बैरागवाडी येथील प्रवीण माने यांच्या शेतावर “डाळिंब एक खोड तंत्रज्ञान” या विषयावर आयोजित कार्यशाळेस शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी लोकमंगल सहकारी साखर कारखाना, बीबीदारफळ येथील डाळिंब प्लॉटवर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या कार्यशाळेस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह कर्नाटक, गुजरात, राजस्थान आणि आंध्र प्रदेशातील जवळपास १५०० डाळिंब उत्पादक, शेतकरी बांधव उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात डाळिंबास भौगोलिक मानांकन मिळाले असून सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब जगाच्या पाठीवर कोणत्याही बाजारपेठेत त्याच्या गुणात्मक वैशिष्ट्यामुळे मागणी वाढत आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपूर्वीपासून डाळिंबाच्या बागा अनेक समस्यांमुळे उध्वस्त झाले आहेत. शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली लोकमंगल सहकारी साखर कारखाना, बीबीदारफळ येथील डाळिंब प्लॉटवर प्रत्यक्ष भेट पाहणी कार्यक्रम व मोडनिंब बैरागवाडी येथील प्रवीण माने यांचे शेतावर एक खोड तंत्रज्ञान कार्यशाळा झाली. डाळिंबातील या समस्यावर शाश्वत प्रतिबंधात्मक उपाययोजना करून प्रवीण माने यांनी डाळिंब शेतकऱ्यांना एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गवसाने, मदन मुकणे (कृषी उपसंचालक स्मार्ट सोलापूर), शीतल चव्हाण (प्रकल्प संचालक आत्मा सोलापूर), विनोद रणवरे (तहसीलदार माढा), संजय वाकडे०( उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डूवाडी), बी. डी.कदम (तालुका कृषी अधिकारी माढा), शिवाजीराजे कांबळे (माजी सभापती जिल्हा परिषद सोलापूर), .डॉ.प्रा.प्रशांत कुंभार ( मोडनिंब), सर्व कृषी विभागाचे अधिकारी,कर्मचारी आणि महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील तसेच कर्नाटक, गुजरात, राजस्थान आणि आंध्र प्रदेश राज्यातून जवळपास १५०० पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते.प्रास्ताविक संतोष निळ यांनी केले. आभार प्रदर्शन गायकवाड यांनी केले. शेवटी सस्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
===============================================================================================
-
या कार्यशाळेमध्ये “डाळिंब एक खोड तंत्रज्ञान” याविषयी कुमार आशीर्वाद अध्यक्षीय भाषणातून बोलताना म्हणाले की, हे एक खोड तंत्रज्ञान जसेच्या तसे शेतकऱ्यांनी अवलंबले तर डाळिंब शेतकरी अनेक समस्येतून मुक्त होईल. याशिवाय हे तंत्रज्ञानशेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय योजनातून निधी देऊन जिल्हा प्रशासन संपूर्ण मदत करेल. याशिवाय ते पुढे म्हणाले, आपल्या सोलापूर येथील शासकीय निवासस्थान जवळील दोन एकर जमिनीवर असा एक खोडतंत्रज्ञानाचा प्लॉट माने यांनी उभा करावा, असे आवाहनदेखील केले.
-
जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी दत्तात्रेय गवसाने म्हणाले की,प्रवीण माने यांनी त्यांच्या शेतावर स्वखर्चाने अहोरात्र गेली दहा वर्ष संशोधन करून हे “एक खोड तंत्रज्ञान” शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. अनेक शेतकऱ्यांनी असे एक खोड पद्धतीने प्लॉट उभे केलेले आहेत, हे येथील उपस्थित शेतकऱ्यांच्या चर्चेतून लक्षात आले.
-
तांत्रिक मार्गदर्शन करताना प्रा. प्रशांत कुंभार म्हणाले की, डाळिंबाची नैसर्गिक ताकद ओळखून त्याला पूरक पद्धतीने प्रवीण माने यांनी संशोधित केलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना जर शेतकऱ्यांनी वेळेवर अवलंबल्या तर जमिनीची आरोग्यता वाढतेच, पण डाळिंबातील ज्वलंत समस्या आपोआप कमी होऊन डाळिंबाचे गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादन मिळते. डाळिंब पीक उत्पादनाचा खर्च कमी होतो. त्यामुळे पैसे श्रम व वेळ बचत होते.
-
प्रवीण माने यांनी त्यांचे “एक खोड तंत्रज्ञान” विषयी प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शंका- समाधानाचे निरसन केले.