वडाळ्यातील लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात गुरु पौर्णिमा साजरी
By assal solapuri ।।
सोलापूर : वडाळा येथील श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सचिन फुगे अध्यक्षस्थानी होते .या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लोकमंगल महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी दरालींग नागनाथ बंगाले, कृषी कल्याणी फार्मर प्रोडूसर कंपनी), रविराज घाडगे, श्रीराम कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व सर्वांनी नम्रपणे अभिवादन केले. कार्यक्रमात सुरुवातीला महाविद्यालयातील उपस्थित गुरुवर्यांचे विद्यार्थ्यांकडून पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.
आपल्या गुरुजनांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये भक्ती काटकर, ऐश्वर्या लिगाडे, प्रियंका वळसे, रेणुका गिरी रामेश्वरी महामुनी, देवश्री धावणे यांचा समावेश होता. यानंतर प्रा. स्वप्निल कदम यांनी गुरु शिष्याची नाते छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकोबाराया यांचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना सांगितले तसेच गुरुपौर्णिमा साजरी करण्यापाठीमागचा हेतू व आयुष्यातील गुरुचे महत्व आपल्या मनोगतामधून विशद केले.
मातीच्या गोळीला आकार द्यावा अशा पद्धतीने गुरु आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत असतात. आपल्या आयुष्यामध्ये गुरुचे मार्गदर्शन फार मोलाचे आहे असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे दरालींग बंगाले यांनी केले. गुरुपौर्णिमाचा संदर्भ हा प्राचीन भारताच्या इतिहासात सापडतो. आपल्या भारतात गुरु-शिष्य परंपरेला खूप मोठी परंपरा आहे. पुराणशास्त्राच्या दाखल्यानुसार, महाभारत या महाकाव्याचे निर्माता व्यास ऋषींनी आषाढी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या शिष्यांना आणि इतर ऋषींना वेद आणि पुराणांचे ज्ञान दिलं होतं. याच दिवसाचे स्मरण म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते असे मार्गदर्शन लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन फुगे यांनी विद्यार्थ्यांना केले. सूत्रसंचालन विद्यार्थीनी प्रियंका वळसे व आभार प्रदर्शन विद्यार्थी श्रेयश चराटे यांनी केले.